वाढत्या तापमानामुळे शिंदखेडकरांना घराबाहेर निघणेही झाले कठीण

0

शिंदखेडा । असह्य होणा-या तापमानाचे चटके सध्या कमालीचे जाणवू लागले आहेत. गेल्या चार -पाच दिवसांपासून सूर्य जणू आग ओकू लागला असून वाढत्या तापमानामुळे शिंदखेडकरांना घराबाहेर निघणेही कठीण झाले आहे. मधून मधून ढगाळ वातावरण होत असले तरी शहरातील पारा 42 ते 44 अंशावर स्थिरावला आहे. रात्री उशिरापर्यंत उष्ण झळांचा प्रत्यय येत असून मध्यरात्रीपर्यंत वातावरण थंड होतांना दिसत नाही. स्वतःची काळजी घेत शिंदखेडकर अशा तीव्र उन्हात कामानिमीत्त तसेच लग्नात हजेरी लावतांना दिसत आहेत. मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या उन्हाच्या तीव्रतेने मे महिन्याच्या अखेरीस उच्चत्तम पातळी गाठली आहे. आठवडाभरापासून तापमानाचा पारा 42ते44 अंशावर स्थिरावला आहे. सकाळी आठ वाजेपासूनच उन्हाची तीव्रता जाणवते.

यामुळे घरातून बाहेर निघण्यास देखील कोणी तयार नाही. उन्हाच्या तीव्रतेमुळे शहरातील प्रमुख रस्तेही ओस पडलेले पाहावयास मिळतात. ऐन दुपारी बारा वाजेपासून ते चार वाजेपर्यंत अघोषीत संचारबंदी पाहावयास मिळते.सहानंतर काही जण घरातून बाहेर पडतांना दिसतात. दिवसभर असलेल्या उष्णतेमुळे रात्री उशिरापर्यंत उष्णतेच्या झळा जाणवत आहेत.

नागरिकांच्या फिरायच्या वेळेत बदल
प्रकृती स्वाथ्यासाठी सायंकाळी फिरायला जाणा-या नागरीकांची संख्या देखील मोठी आहे.यांत महिलांचाही समावेश आहे.मात्र उन्हाची तीव्रता व झळा अधिक असल्याने नागरीकांनी फिरण्याच्या वेळेत बदल केलेला दिसून येतो .सायंकाळी पाच वाजता फिरायला जाणारी मंडळी आता सात वाजेला फिरायला जातांना दिसत आहेत.काही मंडळी रात्री भोजनानंतर फिरायला गर्दी करतात. तर काही मंडळी झोपमोड करून पहाटेला फिरण पसंत करतात. शहरामध्ये रात्री 8 ते10या वेऴेत गार्डनमध्ये आणि बाजारात खरेदि करतांना दिसतात. एकूणच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेने नागरीक हैराण झाले असून उन्हापासून बचाव करण्यासाठी आपल्या दैनंदिन कामकाजात बदल करतांना दिसून येत आहेत.