वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचा तहसिलदार कार्यालयावर मोर्चा

0

भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी म्हणत घोषणाबाजी

पिंपरी चिंचवड : पेट्रोल, डिझलचे वाढते भाव, घरगुती गॅस सिलेंडरचे वाढते दर कमी करावेत, भारनियमन, दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी आकुर्डीतील तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. तसेच निवेदन देवून घोषणाबाजी करण्यात आली.

भाजप सरकारकडून जनतेची फसवणुक…

भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्‍वासने देऊन त्यांनी जनतेची फसवणूक केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ यामुळे सर्वसामान्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. भारनियमानामुळे औद्योगिक भागात उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांना देखील याची झळ पोहचत आहे.

या मागण्यांचे दिले निवेदन…

राज्यातील भारनियमन पूर्णपणे बंद करावे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवळे निघाले आहेत. अल्पवयीन मुली व महिलांवर अन्याय, अत्याचार, विनयभंग, बलात्कार करणार्‍यांना कडक शिक्षा ठोठावण्यात यावी. वाढती गुन्हेगारी तसेच गाड्यांची होणारी तोडफोड करणार्‍यांवर कडक कार्यवाही करण्यात यावी. या सर्व कारणांमुळे जनता भयभीत झाली असून, गृह खात्याविषयी तीव्र असंतोष पसरल्यामुळे राज्याला पूर्णवेळ व स्वतंत्र गृहमंत्री देण्यात यावा. पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, सरसकट शास्तीकर माफीच्या घोषणेचे काय झाले?, रिंगरोड रद्द करावा, रेडझोनची हद्दी कमी करण्यात यावी. अनियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यावा, अशा मागण्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

आंदोलनात यांचा सहभाग…

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नाना काटे, राजू बनसोडे, मयूर कलाटे, फजल शेख, अरुण बोर्‍हाडे, विजय लोखंडे, नगरसेविका वैशाली काळभोर, अनुराधा गोफणे, स्वाती काटे, सुलक्षणा शिलवंत, उषा काळे, निकिता कदम, वर्षा जगताप, गंगा धेंडे, कविता खराडे, सुनील गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.