प्रशासन कागदावर नियोजन करून जनतेची फसवणूक करीत असल्याचा सदस्यांचा आरोप
धुळे । मलेरिया व डेंग्यू सारख्या साथीच्या आजाराने धुळे शहरात नागरिक त्रस्त झाले असून या आजाराबाबत अद्यापही महापालिका प्रशासनाला गांभीर्य नसल्याने भविष्यात या आजारामुळे बळींची संख्या मोजण्याची मनपा प्रशासन वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल सर्वच सदस्यांनी उपस्थित करुन अनर्थ घडल्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा दिला आहे. या साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी आज महासभेत सदस्यांनी केली. या सभेत दुपारी उशीरापर्यंत अजेंड्यावरील विषय चर्चेला न घेता सर्वच सदस्यांनी शहरातील मुलभूत समस्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याकडे लक्ष वेधले. यामुळे सदस्यांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना जाब विचारत धारेवर धरले. आज सकाळी 11 वाजता महापलिका सभागृहात विशेष साधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, उपायुक्त रवींद्र जाधव, प्रभारी नगरसचिव मनोज वाघ यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
अरेरावी करणार्यांवर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
यावर आरोग्य विभागातील वेळापत्रकानुसार प्रभागात स्वच्छेतेसंदर्भात काम न करणार्या अधिकारी व कर्मचार्यांची चौकशी करुन कारवाई करावी, असे आदेश महापौर कल्पना महाले यांनी दिले. नगरसेवक साबीर मोतेब्बर यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी सदस्यांसी अरेरावी करतात. त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा पुढील महासभेत आंदोलन करु,असा इशारा दिला. नगरसेवक पटेल यांनी आपल्या प्रभागातील पाणी पुरवठा व शौचालयाच्या संदर्भात समस्या मांडून प्रभागात विकास कामे करण्याची मागणी केली. तसेच नगरसेवकांचे बँकेत खाते उघडून विकास कामांचा निधी वर्ग करावा. अन्यथा आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करेल, असा इशारा दिला. नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनीही वसुली विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. तसेच प्रभागातील एका कॉम्लेक्समध्ये बांधलेल्या दुकानांच्या मालमत्ता कर वसुलीत भेदभाव होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असून याची चौकशी करावी, अशी मागणी प्रतिभा चौधरी यांनी केली.
अॅबेटींग फवारणी वेळापत्रकानुसार नाही
शहरात मलेरिया, डेंग्यू आजाराबाबत प्रत्येक प्रभागात अॅबेटींग,फवारणी करणे गरजेचे आहे. अन्यथा संपूर्ण शहर या साथीच्या आजारांच्या विळख्यात जाईल. यामुळे मागील वर्षाची पुनरावृत्ती टाळावी. या आजारांवर प्रतिबंधात्मक योजना करण्यासाठी पाठपुरावा केला जातो. परंतू,मनपा प्रशासन कागदावर नियोजन करुन जनतेची फसवणुक करीत आहे. प्रत्येक प्रभागात अॅबेटींग, फवारणी व स्वच्छतेबाबत वेळापत्रक तयार करतात. संबंधित सदस्यांना त्यांची प्रत पुरविली जाते. पण, त्या वेळापत्रकानुसार मलेरीया विभागाचे कर्मचारी अथवा सफाई कामगार ठरल्यानुसार काम करीत नाही. यामुळे फक्त कागदी घोडे नाचवून कार्यवाही केल्याचे भासविले जाते. गल्ली क्र.5 मध्ये अॅबेटींग, फवारणीबाबत तयार केलेल्या वेळापत्रकानुसार काम होत नसल्याने संबंधित विभागातील कामचुकार अधिकारी व कर्मचार्यांना निलंबीत करावे, अशी मागणी नगरसेवक संजय गुजराथी यांनी केली.
नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
सभेच्या सुरवातीला मील परिसरातील प्रभाग क्र.31 मधील विविध मुलभूत समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असून नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरसेवक अमोल मासुळे यांनी प्रशासनावर संताप व्यक्त करीत प्रभागातील विविध समस्यांचा पाढाच वाचला. या प्रभागात सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली असून महिलांची गैरसोय होत आहे. शौचालयात साचणार्या घाणीमुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे. ऐन सणासुदीच्या काळातही पथदिवे नादुरुस्तीमुळे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. पाणी पुरवठाही नियमीत होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासह अन्य समस्यांबाबत मनपा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने या समस्यांकडे दुर्लक्ष करणार्या संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक अमोल मासुळे यांनी केली. याविषयी उपायुक्त रवींद्र जाधव यांनी या समस्यांची दखल घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेत.