जळगाव । गणेश पॅराडाईज मुंदडा नगर परिसरात राहणारे अशोक शिवप्रसाद शर्मा, कविता अशोक शर्मा व मुलगा जयदीप अशोक शर्मा यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात देहदानाचा अर्ज सादर केला. निवृत्त शिक्षक व शिक्षीका असलेल्या या दापत्यांने आयुष्यभर ज्ञानदानाचे कार्य केले. निवृत्तीनंतरही हे कार्य अविरत सूरू ठेवले असून कर्मकांडावर विश्वास न ठेवता ज्ञानदानाबरोबर समाजसेवेचे व्रत स्विकारलेल्या या जोडप्याला आपला देह विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकामी यावा असे वारंवार वाटत असल्याने कविता अशोक शर्मा यांच्या वाढदिवसानिमीत्त देहदानाचा संकल्प केला. आपल्या आईवडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मुलानेही आईबाबाप्रती श्रध्दा दाखवत स्वताही देहदानाचा संकल्प करत नवीन आदर्श समाजासमोर ठेवला आहे.
सकारात्मक विचाराने निर्णय
यावेळी अर्ज सादर करतांना मेल्यानंतर देहाला शांती प्राप्त होणे गरजेचे आहे असा समज असतो आणि म्हणूनच विधीवत अंतिम विधी केले जातात मग विद्यार्थ्याच्या शिक्षणाकामी देह येणे म्हणजे चांगले कार्य नाही का? यातूनच देहाला शांती मिळू शकते असा विचार समोर आला आणि म्हणूनच विचारांती या शिक्षकी पेशाच्या जोडप्याने वाढदिवसाला देहदानाचा संकल्प डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात सादर केला.