वाढदिवसाच्या दिवशीच शरद पवार रस्त्यावर!

0

नागपूर (नीलेश झालटे) : सरकारच्या विरोधात मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या हल्लाबोल यात्रेची मंगळवारी (दि.12) नागपूर विधानसभेवरील जनाक्रोश मोर्चाने सांगता होणार आहे. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार हे या मोर्चात आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सहभागी होणार आहेत. तब्बल 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पवार हे पहिल्यांदाच रस्त्यावर उतरून मोर्चाचे नेतृत्व करतील. एरव्ही पवारांचा वाढदिवस म्हटले की राज्यभर बॅनरबाजी आणि कार्यक्रमांना ऊत आलेला असतो. परंतु, यंदाचा पवारांचा 77 वा वाढदिवस साधेपणे व नागपुरातील आंदोलनातच साजरा होणार आहे. या आंदोलनात राज्यभरातून दोन लाखांच्यावर आंदोलक सहभागी होतील, असा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात आला. त्यानुसार, नागपुरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दुसरीकडे, शेतकरी कर्जमाफीप्रश्नी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधिमंडळात राज्य सरकारचे अक्षरशः वाभाडे काढले. चार महिन्यापूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली; परंतु शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही, नेमका हा पैसा कोणत्या खात्यावर गेला असा सवाल करीत कर्जमाफी करताना सरकारने केलेली नौटंकी उघड होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली. मुंडे यांच्या आरोपानंतर जोरदार गदारोळ उडाल्याने सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी चारवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर गोंधळ कमी होत नसल्याचे दिसून येताच दिवसभरासाठी कामकाज तहकूब झाले. विधानसभेतही कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधक अडून बसल्याने जोरदार गदारोळ उडाला. त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.

शरद पवार, गुलामनबी आझादांच्या नेतृत्वात मोर्चा
प्रदीर्घ कालावधीनंतर शरद पवार आंदोलनात सहभागी होणार आहेत. 32 वर्षांपूर्वी जळगाव ते नागपूर सायकल रॅलीमध्ये ते सहभागी झाले होते. त्यानंतर आता हल्लाबोल जनाक्रोश आंदोलनाचे ते नेतृत्व करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते आमदार हेमंत टाकले यांनी सांगितले की, 1985 साली जळगाव ते नागपूर सायकल मोर्चा निघाला होता. त्यावेळी समाजवादी काँग्रेस पक्षाचे सरकार होते. यापूर्वी त्यांनी मुंबई व पुण्यातदेखील काही मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. पवार यांच्या खांद्याला खांदा लावून काँग्रेसचे राज्यसभेचे नेते गुलामनबी आझाद हेही रस्त्यावर उतरणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाइं यांचा संयुक्तरित्या शेतकर्‍यांच्यासाठी हा मोर्चा असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा नागपुरात दोन वेगवेगळ्या मार्गांनी सकाळी 11 वाजता मोर्चा सुरू होईल. यानंतर हा मोर्चा टी प्वाइंटला एकत्र येणार असून, या ठिकाणी शरद पवार, गुलामनबी आझाद सभेला मार्गदर्शन करतील.

पवारसाहेबांचा वाढदिवस हा दरवर्षी अगदी साधेपणाने आणि सामाजिक उपक्रमाने साजरा केला जातो. यावर्षी मात्र शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरून त्यांचा वाढदिवस साजरा होईल. हे सरकार असंवेदनशील आहे. म्हणून लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळावा या उद्देशाने पवार साहेब या मोर्चात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत.
– आ. अजित पवार, गटनेते, राष्ट्रवादी

सरकारच्या धोरणांचा विरोध या मोर्चाच्या माध्यमातून केला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचा उद्देश हा शेतकरीविरोधी सरकारचा निषेध करणे हाच आहे. हे सरकार फक्त खोटी आश्वासने देत असून, दोन लाखाहून जास्त लोक या मोर्चामध्ये सामील होतील.
– खा. अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

सरकार शेतकर्‍यांसोबत आहे. शेतकर्‍यांची ही स्थिती विरोधकांच्या कार्यकाळातील चुकीच्या धोरणामुळेच झाली आहे. मुख्यमंत्री आणि आमचे सरकार त्यांच्या चुका सुधारून चांगले काम करत आहोत. हा मोर्चा ज्या मुद्द्यांसाठी आहे ते मुद्दे त्यांनीच निर्माण केले आहेत. तरी लोकशाहीत मोर्चा काढण्याची सर्वांना परवानगी आहे त्यामुळे मोर्चाचे स्वागत आहे.
– विनोद तावडे, शिक्षणमंत्री

कर्जमाफीची यादी सभागृहात मांडा : मुंडे
चार महिन्यांपूर्वी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. परंतु शेतकर्‍यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही, नेमका हा पैसा कोणत्या खात्यावर गेला असा सवाल करीत कर्जमाफी करताना सरकारने केलेली नौटंकी उघड होत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत केली. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या रक्कमेसह यादी सभागृहासमोर ठेवा अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यात धुमने या शेतकर्‍याच्या घरी मुक्काम केला त्या शेतकर्‍याची कर्जमाफी झाली नाही. कर्जमाफीची आस लागलेल्या धुमनेच्या भावाचा मृत्यू झाल्याने मुख्यमंत्र्यांची ही नाटक नौटंकी बाहेर पडली आहे असा आरोप मुंडे यांनी करताच, सभागृहात एकच गोंधळ सुरू झाला. गोंधळामुळे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी चारवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब केले. अखेर गोंधळ कमी होत नसल्याचे दिसून येताच दिवसभरासाठी कामकाज तहकूब करीत असल्याचे सभापतींनी जाहीर केले.

जो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है!
अपेक्षेप्रमाणे हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादळी ठरला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतील घोळ, कापसावर पडलेल्या बोंडअळीने विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकर्‍यांची झालेली हजारो कोटींची हानी, विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा झालेला मृत्यू व राज्यभरात शेतकर्‍यांच्या आत्महत्येचे सत्र, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेवरून विरोधी पक्ष काँग्रेस आणि राट्रवादीच्या आमदारांनी अधिवेशन सुरु होण्याआधीच कर्जमाफीसह अनेक मुद्द्यांवरुन विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून घोषणा दिल्या. ‘भाजप सरकार हटवा, कापूस वाचवा’, ‘जो सरकार निकम्मी है’, वो सरकार बदलनी है’, ‘हे नव्हे माझं सरकार’ अशा सरकारचा निषेध करणार्‍या घोषणांचे फलक आमदारांच्या हातात होते. आघाडी सरकारने 15 वर्षात काय केले, हे विचारत बसण्यापेक्षा तुम्ही मागच्या तीन वर्षात काय केले, याचा हिशेब द्या, अशी मागणी अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली.