वाढदिवस ठरला जितेंद्रचा घातवार

0

शहादा। शहादा ते धडगाव रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन हाकणा-या चालकाचा वाहनावरील नियंञण सुटल्याने वाहन पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत एक तरूण ठार तर तीन जण गंभीर जखमी आहेत.ही घटना दरा गावालगत पहाटे दोन ते तीन वाजेच्या सुमारास पडली आहे.अपघातात ठार झालेल्या युवकाचा वाढदिवसादिवशी दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना घडल्याने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.

धडगाव येथे कार्यक्रमाला जात असतांना अपघात
पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की,होण्डा सिटी वाहन क्र.एम.एच.39ए 7877 या वाहनाने शहादा येथिल जितेंद्र शांतीलाल मोरे (वय 27),धनंजय ज्ञानेश्वर लोहार ,प्रविण दिलीप मराठे व जगदिश विजय वाघ हे चार ही मिञ धडगाव येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असतांना शहादा ते धडगाव रस्त्यावर दरा गावाजवळ वाहन चालक जगदिश वाघ याचे वाहनावरील नियंञण सुटल्याने व रस्त्याचा अंदाज चुकल्याने वाहान पलटी होऊन रस्त्यालगतच्या झोपडी जवळ येऊन थांबली. सदर अपघातामुळे गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. अपघातग्रस्त गाडीजवळ जाऊन अपघातग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी जवळील पोलिस स्टेशन व रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

वाढदिवशीच्या दिवशी काळाने घातला घाला.!
अपघातात ठार झालेला जितेंद्र शांतीलाल मोरे हा युवक आई-वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. दि.25 जून रोजी त्याचा वाढदिवस होता. घरी त्याच्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा झाला होता. राञी 11वाजच्या सुमारास कुटुबासोबत आनंदी वातावरणात रमला असतांना त्याच्या मिञांनी घरी येऊन त्यास धडगाव येथे कार्यक्रमास जाण्यासाठी आग्रह धरला. त्याचवेळी त्याने व आई-वडीलांनी त्या मिञांना नकार दिला.माञ आग्रहा खातर तो सोबत गेला अन दोन वाजेच्या सुमारास त्याच्या वाहनास अपघात होऊन जितेंद्र मोरे हा जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच त्याचा परिवाराने हंबरडा फोडला.एकुलता एक मुलगा हरपल्याने त्याचा परिवार सुन्न झाला आहे.या घटनेने सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे. सोमवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गंभीर दुखापतीने जागीच ठार
वाहनाने दोन तीन पलटी मारल्याने वाहनातील चौघे तरूण बाहेर फेकले गेले.यातील जितेंद्र शांतीलाल मोरे (27) हा वाहानापासून ब-याच अंतरावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन तो जागीच ठार झाला.तर अन्य तिघे युवक गंभीर जखमी झाले आहेत .यातील प्रविण दिलीप मराठे याच्या डोक्यालाही मार लागल्याने सुरत येथे उपचार्थ दाखल केले आहे.तर वाहन चालक जगदिश वाघ व धनंजय लोहार या दोघांना धुळे येथे रूग्णालयात हलविले आहे. अपघाताची नोंद म्हसावद पोलीसात करण्यात आली आहे.