शिंदखेडा। तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन बागुल यांचा 5 एप्रिल रोजी वाढदिवस होता. आपला वाढदिवस न साजरा करता भडणे येथील गोरगरीब, मजूर वर्ग यांना तांदूळ तसेच डेटॉल साबण देऊन एक माणुसकीचा धर्म जोपासुन मदतीचा हात दिला.
राज्यात कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासन व आरोग्य विभाग प्रत्येक नागरिकाची आरोग्याची काळजी घेत आहे. अशातच विविध संघटना तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर मदतीसाठी पुढाकार घेऊन गावात मदत करून जनजागृती करीत आहेत. भडणेचे पोलीस पाटील युवराज माळी यांनी गावात जनजागृती तसेच गावकऱ्यांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कंबर कसली आहे. गावात लॉकडाऊनच्या काळात आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन आरोग्य केंद्रात पाठवून त्यांना होम कोर्ट कारटाईनचा शिक्का मारून त्यांना 14 दिवस घरात राहण्याचे व आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवाहन करीत आहेत. गर्दी होऊ न देता खबरदारी म्हणून दवंडी दररोज दिली जाते. या संकट काळात शंभर कुटुंबांना घरोघरी स्वखर्चाने तांदूळ, डेटॉल साबण वाटप केला. एक माणुसकी धर्म जोपासल्याने त्यांचे भडणेकरांनी कौतुक केले. यावेळी विक्रम पाटील, पोपट बोरसे, सचिन पाटील, मनोहर पाटील, कृष्णा पाटील, भाऊसाहेब ठाकूर उपस्थित होते.