वाहनतळाची व्यवस्थाच नसल्याने पार्किंगचा त्रास
पिंपरी : बेशिस्त वाहनचालक, अतिक्रमणांचा विळखा यामुळे येथील साई चौकात वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. महापालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. दुपारी तसेच सायंकाळी तर याठिकाणी वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. ही समस्या सोडविण्यासाठी शहर वाहतूक शाखेने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता सणासुदीचे दिवस आहेत. खरेदीसाठी नागरिक बाजारपेठेत येतील. त्यामुळे पुढच्या काळात साई चौकातून वाट काढणे खूप कठीण होणार आहे. त्यामुळे आतापासूनच काहीतरी हालचाल करणे गरजेचे असल्याचा सूर नागरिकांतून उमटत आहे.
वर्दळीचा चौक
पिंपरीतील साई चौक परिसरात शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ आहे. येथे कायमच खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते. हा चौक सतत गजबजलेला असतो. परिसरातील अरुंद रस्ते, रस्त्यांवरील अतिक्रमणे, वाहतुकीचे नियम न पाळणारे वाहनचालक यामुळे वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असतो. विविध हॉस्पिटल, शाळा असल्याने मोठी वर्दळ असते. शहर वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांच्या दुर्लक्षामुळे येथील वाहतूक व्यवस्था नियंत्रणाअभावी विस्कळीत झाल्याचे दिसून येते. तसेच वाहतुकीचे नियम मोडणारेच जास्त असल्याने, वाहतूक कोंडी होते. दिवसा प्रवेश बंदी असतानाही अवजड वाहने बाजारात घुसतात. पोलिसांनी पंधरा दिवस कडक कारवाई केल्यास नागरिकांना नियम पाळण्याची सवय लागेल.
एकेरी मार्ग नावालाच
शगून चौकातून काळेवाडी, पिंपरी गावाकडे जाण्यासाठी एकेरी मार्ग आहे. मात्र, रिव्हर रोडने जाणारी वाहने कराची चौकात ‘नो एंट्री’त घुसून शगून चौकात दाखल होतात. त्यामुळे एकेरी मार्गाने येणार्या वाहनांना अडथळा निर्माण होतो. अनेकदा वाहतूक पोलीस कर्तव्यस्थळी नसतात. येथील एकेरी मार्ग नावालाच उरला असून, वाहनचालक कुठेही वाहने घुसवतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी एका ठिकाणी न थांबता वाहतुकीचे योग्य नियमन करणे गरजेचे आहे.
रस्ते झाले अरुंद
साई चौकातील सर्व बाजूंच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रस्त्यालगत असलेले दुकानदार, हातगाड्या व व्यावसायिकांनी आपापल्या दुकानांतील बहुतांश माल रस्त्यावरच मांडला आहे. रस्ते अतिक्रमणांनी वेढले असल्याने ते अरुंद झाले आहेत. रस्त्यावर विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू, त्यात वाहनतळाची व्यवस्था नसल्याने रस्त्यावरच वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडते. ही समस्या नित्याचीच असूनही महापालिका प्रशासन व शहर वाहतूक शाखा कोणतीही कार्यवाही करत नसल्याची स्थिती आहे.