तळेगाव दाभाडे : वाढीव मालमत्ता कर रद्द करण्याबाबत विशेष सभा घेण्यात यावी, अशी मागणी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्याकडे केली. नगरसेवक बापुसाहेब भेगडे यांनी नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने चतुर्थ वार्षिक कर आकारणी 2012-13 पासून केली असून ही करवाढ अन्यायकारक आहे. करवाढ रद्द करण्यासंदर्भात आपण पत्रकारपरिषद घेऊन स्वच्छतेवर लावण्यात येणार कर 100 टक्के रद्द करणे, नव्याने सर्वेक्षण करणे, संपूर्ण कारवाढीमध्ये 15 टक्के सूट देणे अशा प्रकारची काही आश्वासने दिलेली होती.
हे देखील वाचा
आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा
करवाढीचा विरोधात राष्ट्रवादीच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात निवेदन देखील देण्यात आले होते. वाढीव मालमत्ताकरामुळे नागरिक त्रस्त असून अन्यायकारक करवाढ रद्द करण्यासंदर्भात विशेष सभा बोलवावी. अन्यथा आपल्या घरावर तळेगावकर नागरिकांचा आक्रोश मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देताना गटनेते किशोर भेगडे, नगरसेवक अरुण माने, माजी शिक्षण मंडळ सदस्य बापु कदम, किशोर कवडे, निरंजन जहागीरदार आदी उपस्थित होते.