वाढीव पाणीपुरवठा पाईप लाईनसह भूमिगत गटारींचा ठराव मंजूर

0

वरणगाव पालिकेची स्थायी समितीची बैठक : सीएसआर निधीची मागणी

वरणगाव- स्थायी समितीची बैठक नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शहराची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता आहे त्या पाणीपुरवठा योजनेवर ताण येत असल्याने नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना तयार करून नवीन पाईप लाईन टाकण्यासह नारी मळा येथील जीर्ण जलकुंभ पाडून तेथे नवा जलकुंभ उभारण्याचा ठराव सभेत करण्यात आला. शिवाण शहराच्या नवीन विस्तारित भागात नवीन टाक्या बांधण्यासह जलशुद्धीकरण यंत्रणेत सुधारणा करणे, पाईप लाईन टाकणे, संपूर्ण शहरात भूमिगत गटारी करणे व रस्ते करणे यासाठी प्रकल्प सल्लागार नेमणे व तत्काळ प्रस्ताव तयार करून शासनाकडे दोन महिन्याच्या आत मंजुरीसाठी पाठवून घन कचरा प्रकल्पाचे बांधकाम तत्काळ करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली.

मंत्री महाजनांच्या अभिनंदनाचा ठराव
जळगाव महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक 57 जागा मिळाल्याने विजयाचे शिल्पकार असलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. संपूर्ण शहरात केंद्र सरकारच्या योजनेतुन ईसीएल एलईडी लाईट लावण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करून एलईडी बसवण्यासंदर्भात कार्यवाही करणे तसेच शासनाच्या नाविण्यपूर्ण योजनेतून संपूर्ण शहरात सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे, नगरपरीषद इमारतीत सौर ऊर्जेवर यंत्रणा चालवण्यासाठी नाविण्यपूर्ण योजनेतून निधीसाठी मागणी प्रस्ताव तयार करणे तसेच दीपनगर वीज निर्मिती केंद्रातून होणारे प्रदूषण तत्काळ थांबवणे व वरणगाव शहरात जे प्रदूषण होत आहे त्यावर उपाययोजना तत्काळ करून सीएसआर निधी वरणगाव शहरासाठी देण्यात यावा या विषयाला सभागृहात मंजुरी देण्यात आली. बैठकीस उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसूफ, सभापती माला मेढे, शशी कोलते, नसरीन बी.साजीद कुरेशी, लिपिक संजीव माळी, दीपक भंगाळे उपस्थित होते.