पिंपळनेर । येथील नवीन वसाहतीच्या नागरिकासांठी 7.5 कोटी रूपये खर्चाची वाढीव पाणी पुरवठा योजना या आठवड्यात मंजुर करण्यात येणार आहे, अशी माहिती कृषी, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जेबापूर येथे पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना दिली. पुढील 20 वर्षाची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून संबंधित अधिकार्यांना तसा आराखडा-ईस्टीमेट तयार करून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले असल्याचे सांगत नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना ही फिल्टर प्लॅनसह असणार आहे. पिपळनेर गावाशी खास जिव्हाळ्याचे नाते आहे व माझे कर्तव्य म्हणून खास नागरिकांसाठी ही सुविधा शासनाच्या संबंधित विभागाकडून मंजुर करून घेण्याचे मी ठरवले आहे, असे ना.खोत म्हणाले. वाढीव पाणी पुरवठा योजना ही 5.5 कोटीची असली तरी यासाठी 7 कोटी पन्नास लाखांचा अंदाजित खर्चाची तरतूद करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
निमंत्रीत सदस्यांचा सत्कार
याप्रसंगी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य म्हणून विलासराव भदाणे यांची नियुक्ति झाल्याने त्यांचा ही ना.खोत यांनी सत्कार केला. यावेळी प्रदीप सोनवणे, शामकांत पाटील- शिरसाठ, जयवंत बागड, देविदास नेरकर,गणेश साबळे, गजेन्द्र कोतकर, आर.पी.गवळी, विलास भदाणे, श्याम पाटील, व परिसरातील अनेक नागरिकांनी मंत्री ना.खोत यांचा शालश्रीफळ देऊन स्वागत केले.
चाळीची संख्या वाढविणार
यावेळी ना.खोत यांनी शासनाच्या विविध योजना व कृषि विभागाच्या योजना समजावून सांगत शेतक-यांनी नवीन तंत्रज्ञान अवलंबून शेती करावी असे सांगितले. यावेळी अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी सांगळे, तालुका कृषी अधिकारी ठाकरे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. रयत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलासराव भदाणे यांनी साक्री तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी शेडनेट व कांदा चाळीची संख्या वाढवून देण्याची मागणी ना.खोत यांच्याकडे केली असता यासाठी लगेच विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
योजनेचा विस्तार
नवीन कॉलनीत ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेचा विस्तार नसल्याने पाणी हे स्वतंत्र खाजगी बोअरवेलचा उपयोग केला जात आहे. गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांची स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची मागणी होती. त्याअनुशंगाने नामदार खोत यांनी ही योजना कर्तव्याची जाणिव ठेवून या आठ दिवसांत प्रशासकीय मंजुरी मिळवून देणार, असे सांगत फिल्टर प्लॅनसह ही योजना असणार आहे. असेही ना.सदाभाऊ खोत यांनी सांगितल. याच दिवशी धोंगडेदिगर येथे नामदार सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळावा ही घेण्यात आला.