वातूककोंडीवर उड्डाणपूल, बाह्यवळणाचा पर्याय

0

पुणे-नगर महामार्गावर वाघोलीत वाहतूककोंडीची समस्या गंभीर

वाघोली : वाघोली येथे पुणे-नगर महामार्गावर भेडसावत असलेल्या वाहतूककोंडीवर दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे. काही दिवसांपासून ग्रामपंचायत, स्थानिक तरुणांकडून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी सुटली असली तरी दीर्घकालीन वाहतूक कोंडी सोडवायची असेल तर बाह्यवळण व उड्डाणपूल हाच पर्याय महत्वाचा ठरणारा आहे.
नगर महामार्गावरची वाहतूककोंडी सोडविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम (प्रकल्प), परिवहन, विद्युतमंडळ, महसूल, लोकप्रतिनिधी, वाहतूक तज्ञ, स्थानिक नागरिक, स्वंयसेवी संस्थाचे प्रतिनिधी वारंवार बैठका घेत आहेत. मात्र, अद्यापही वाहतूक कोंडीवर ठोस तोडगा निघू शकलेला नाही.

उपाययोजना गरजेची

आव्हाळवाडी, मांजरीकडून नगरकडे जाणारी वाहने वाघेश्‍वर चौकाला वळसा मारून नेणे, भावडीकडून वाघेश्‍वर चौकातून विरुद्ध दिशेने बाईफ रोडला जाणारी वाहने बंद करून आव्हाळवाडी फाट्यावरून वळवणे, केसनंदकडून येणारी वाहने पुण्याकडे सरळ जातील, मात्र त्यांना नगरकडे जायचे झाल्यास केसनंद चौकातून वळवणे, जड वाहनांसाठी वेळ निश्‍चित करावी, रस्त्याच्या दोन्ही बाजूने लेन वाढवणे, बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.

रस्ता रुंदीकरण, भुयारी मार्गाची मागणी

पुणे-नगर महामार्गावरील वाघोली हे गाव मराठवाडा, विदर्भ व अन्य राज्याशी जोडल्या जाणार्‍या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्रबिंदू व पुण्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. नगर महामार्गावर वाघोली गाव असून आळंदी, थेऊर अशा विविध धार्मिक स्थळांसह चाकण, रांजणगाव, सणसवाडी, शिक्रापूरसारख्या औद्योगिक वसाहतींना जोडणारे उपनगर असल्यामुळे वाहनांची प्रचंड वर्दळ असते. तसेच केसनंद, हडपसर, थेऊर आदी गावांचे रस्ते वाघोलीला जोडलेले असल्यामुळे वाहनांची अधिक भर पडते. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून वाघोलीत वाहतूककोंडीचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. ग्रामपंचायतसह स्थानिक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, भुयारी मार्गाची वारंवार शासनाकडे मागणी करीत आहेत. परंतु त्याकडे लक्ष देण्यास कोणासही वेळ नसल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतिनिधी व संबधित अधिकारी उपाययोजना करण्याच्या केवळ घोषणाच करत आहेत. प्रत्यक्षात मात्र एकाही घोषणेची अंमलबजावणी येथे झालेली नाही.

आमदार, खासदारांची आश्‍वासने हवेत विरल

स्थानिकांनी वारंवार मागणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुणे-नगर महामार्गावर होणार्‍या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी 1200 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता. यामध्ये उड्डाणपूलासह शिरूरपर्यंत सहा पदरी रस्ता, मोर्‍या व भुयारी मार्ग आदी बाबी समाविष्ट करण्यात आल्या होत्या. मागील वर्षी जानेवारीला पहिल्या टप्प्यातील कामही सुरू होणार असल्याची माहिती अधिक्षक अभियंता आणि आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली होती. पुणे-नगर महामार्ग राष्ट्रीय महामार्गात जात असल्यामुळे उड्डाणपूल, भुयारी मार्ग जागीच उरला. त्यानंतर पीएमआरडीए अस्तित्वात आली आणि वाहतूक कोंडीचा चेंडू पीएमआरडीएकडे वळविण्यात आला. विविध विभागाच्या फेर्‍यात उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, भुयारी मार्ग अडकला असून चार वर्षापासून संबधित अधिकार्‍यांकडून व आमदार, खासदार यांच्याकडून केवळ आश्‍वासने देऊन नागरिकांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.

वातूककोंडीवर उड्डाणपूल, बाह्यवळणाचा पर्याय

रस्ता रुंदीकरण किंवा सिग्नल लावून वाहतूक समस्या तात्पुरती शकते. परंतु उड्डाणपूल व बाह्यवळण केल्यास दिर्घकालीन वाहतूक कोंडी सुटू शकते. पीएमआरडीच्या माध्यमातून चौकांचे रुंदीकरण करून महामार्गाच्या दोन्ही बाजूने एक लेन वाढवून रुंदीकरण केले जाणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली जाणार आहे.
– रामदास दाभाडे, माजी जि. प. सदस्य

वाहतूककोंडीचे कारणे

अरुंद आणि खचलेला रस्ता, महामार्गावर असणार्‍या चारचाकी शोरूमच्यासमोर लावण्यात येणारी मोठमोठी कंटेनर व दुकानासमोर लावण्यात येणारे बेशिस्त वाहने, विरुद्ध दिशेने येणारी वाहने, शाळा भरताना जड वाहनांची वाहतूक, फेरीवालर वाहतुकीला अडथळा ठरत आहेत.