वादग्रस्त बाबामुळे मॅरेथॉन वादात

0

उल्हासनगर । उल्हासनगर शहरात कॅन्सर जनजागृती व कॅन्सर पीडित रुग्णांच्या मदतीसाठी आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. आयोजकांनी प्रमुख पाहुणे म्हणून अब्दुल नामक वादग्रस्त बाबाला बोलावल्यामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येत आहे. सावित्रीबाई फुले संस्थेतर्फे रविवारी मॅरेथॉन 2017 स्पर्धा आयोजित केली होती. मॅरेथॉनच्या कार्यक्रमात आमदार ज्योती कलानी , महापौर मीना आयलानी, सहित अन्य राजकीय नेते आणि मनपाचे प्रशासकीय अधिकारी सामील होणार असल्याचे सांगितले होते. मात्र या मॅरेथॉन स्पर्धेत कल्याणचा वादग्रस्त अब्दुल बाबा याने टी शर्ट स्पॉन्सर केल्याचे दिसून आले.

एवढेच नव्हे तर बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमात देखील अब्दुल बाबाला प्राधान्य देण्यात आले. हे वृत्त व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांचे शिक्षण तसेच अंधश्रद्धा निर्मूलन साठी खर्च केले. अशा महान सावित्रीबाई फुलेंच्या नावाने संस्था सुरू करणार्‍या आयोजकांनी अब्दुल बाबा सारख्या वादग्रस्त व्यक्तीला बोलावले व त्याच्याकडून टी शर्ट देखील घेतले ही लाजिरवाणी बाब आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटल्या. या संदर्भात सावित्रीबाई फुले संस्थेचे पदाधिकारी अनिल मोरे, विशाल मोरे, नारायण वाघ, राजेंद्र देठे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.