मालवण । मालवण शहरात ‘किल्ला विकणे आहे’ अशा आशयाचा फलक लावणारा मुख्य सूत्रधार हा सिद्धार्थ सकपाळ ( मुंबई, मूळ सिंधुदुर्ग) किल्ल्यावरील रहिवासी असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात पाच युवकांचा सहभाग असून सिद्धार्थ सकपाळ, नितीन शिर्सेकर, राजाराम कानसे, सुमित कवठकर, प्रसाद कवठकर (देऊळवाडा) अशा पाच युवकांचा समावेश आहे. याप्रकरणी मालवण पोलिसांनी जलद गतीने तपास केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अवघ्या काही तासांत तिघाजणांच्या मुसक्या आवळल्या.
पोलिसांच्या कामगिरीचे शिवप्रेमी, वायरी ग्रा. पं., किल्ले प्रेरणोत्सव समितीने अभिनंदन केले. सायंकाळी ‘त्या’ पाचही युवकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
मालवण शहरात रविवारी रात्री चार ठिकाणी ‘किल्ला विकणे आहे’ अशा आशयाचे फलक या युवकांनी लावले होते. सोमवारी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यासंबंधी बदनामीकारक फलक लावल्याच्या प्रकारावरून शिवप्रेमींसह किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, किल्ला रहिवासी संघ, होडी वाहतूक संघटना यांनी संताप व्यक्त करत निषेध नोंदविला. संबंधितांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करा, या मागणीसाठी आज पुन्हा किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती आक्रमक झाली. त्यांनी पोलिसांची भेट घेतली. त्या पाचजणांवर कठोर कारवाई करा अशी आक्रमक भूमिका घेतली.