जनजीवन विस्कळीत, दोन दगडी मिनार कोसळले असून, घुमटही जमीनदोस्त
आग्रा – जगाच्या इतिहासात नावलौकिक प्राप्त केलेल्या ताजमहालला वादळाचा तडाखा बसला आहे. आग्रा येथे काल सायंकाळी आलेल्या वादळामुळे सर्वसामान्यांचे हाल तर झालेच, पण ताजमहाललाही मोठा तडाखा बसला. वादळामुळे ताजमहालचे दोन दगडी मिनार कोसळले असून, घुमट जमीनदोस्त झाले. काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास उत्तर प्रदेशला वादळाचा जबरदस्त तडाखा बसला. आग्रामध्ये ताशी 130 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.
वादळाने आग्रा शहरात हाहाकार
ताजमहलचा मुख्य दरवाजा आणि दरवाजा-ए-रौजावरील 12 फुटी मिनारही वादळामुळे कोलमडली आहेत. विशेष म्हणजे, ताजमहलचे दर्शन सर्वात आधी याच दरवाजातून होत असते. वादळामुळे आग्रा शहरात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वृक्ष आणि विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. केवळ अर्ध्या तासात मोठा हाहाकार माजवणार्या या वादळात मथुरेत चार, तर बिजनौरमध्ये एक व्यक्ती दगावला आहे. वादळ ओसरल्यानंतर येथील तापमान कमालीचे घटले असून, 22 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे.