वादळानंतरचे शहाणपण

0

वादळापूर्वी शांतता असते. या शांततेत अनेक आवाज ऐकायचे असतात. पुढच्या धोक्याच्या सूचना जाणून घ्यायच्या असतात. शांतीकाळात सज्जतेसाठी मेहनत घेतली नाही, तर युद्धात हानी ही ठरलेलीच असते. भले हे युद्ध माणसामाणसांतील असो वा माणूस आणि निसर्गातील. बदलते पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिंग, भूगर्भातील अस्थिरता हे काही आजचे विषय नाहीत. कच्च्या-बच्च्यांना तोंडपाठ होतील इतक्या वेळा यावर चर्चा झालीय. माहितीचा महापूर आलाय, पण ज्ञानाचे काय? स्वतःच्या अस्तित्वाविषयी आज माणूस इतका का बेपर्वा झालाय?, याचं उत्तर मिळत नाही. प्रत्येकाला तथाकथित सुख हवंय, पण त्या सुखाची कालमर्यादा किती हे कोण तपासून पाहणार? पाच रुपयांचा बिस्कीटचा पुडा घेतानासुद्धा एक्सपायरी डेट पाहिली जाते, मग सध्या जीवनशैलीची व्यावहारिकता का तपासली जात नाही. एखादा मोठा अपघात झाल्याशिवाय सरकार कारवाई करत नाही, असे आपण नेहमीच म्हणतो. आपण तरी त्याहून कुठे वेगळे आहोत? निसर्गाने एखादा तडाखा दिला की खडबडून जागे होणार आणि जरा वेळ गेला की पुन्हा बेपर्वा निद्रिस्त. डोळे झाकून दूध पिणार्‍या मांजरीसारखी आपली अवस्था. पण त्यामुळे धोका टळत नाही, फार फार तर काही काळासाठी अज्ञानातील सुख लाभते एवढेच. आजचेच उदाहरण बघा. तिकडे केरळ, तामीळनाडूमध्ये ओखी वादळाने धुमाकूळ घातलाय. मुंबई – गुजरातच्या किनारी पट्ट्याला सावधानतेचा इशारा मिळालाय. अलीकडे असे इशारे असे तडाखे जवळपास नेहमीचेच झालेत. पीकपाण्याचे प्रश्‍न गंभीर झालेत. पण या सगळ्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्याची आपल्याला अजूनही गरज वाटत नाही. त्यापेक्षा गुजरातच्या निवडणुकीत काय होणार? याकडे आमचे सर्वाधिक लक्ष आहे. पर्यावरणाचा विषय आला की वृक्षारोपणाचा इव्हेंट आणि प्लास्टिकबंदी एवढ्यावरच आमचं घोडं अडतं. आज महाराष्ट्रात जवळपास सहाव्यांदा प्लास्टिकबंदीची घोषणा झालीय, तीसुद्धा पुढच्या सहा महिन्यांत टप्प्याटप्प्याने. मग आधीच्या पाच घोषणांचे काय झाले? मुंबईसारख्या बेटांच्या शहरात कुठलाही पर्यावरणीय अभ्यास न करता भूमिगत मेट्रोचे काम सुरू झालंय. वर उभ्या असलेल्या इमारतींना तडे जाताहेत, तरीही आमचे मुख्यमंत्री महोदय विकासाला साथ द्या म्हणताहेत. आजच जागोजागी इमारती कोसळण्याच्या घटना घडत असताना असे थडग्यांवरचे इमले हवेत कशाला? दळणवळणाची गरज आहे खरी, पण त्याचबरोबर मनुष्य जात टिकून राहणेही तेवढेच महत्त्वाचे नाही का? धोरणात्मक पातळीवरची आपली ही बेपर्वाई आपल्या रोजच्या जगण्यातही तितकीच खोलवर रुजली आहे. मरणाच्या प्रतीक्षेत असल्यासारखे आपले रोजचे जगणे आहे. 2004 च्या त्सुनामीत आपल्याकडे मृतांची संख्या प्रचंड वाढली. कारण? आपली अकारण उत्सुकता. समुद्राचे पाणी मागे हटल्यावर लोक तिकडे चमत्कार बघायला धावले आणि परतीच्या त्सुनामी लाटांत हकनाक मारले गेले. तेव्हा कदाचित आपल्याकडे त्सुनामीचा धोका नवा होता. पण आजही आपण त्याच स्थितीत आहोत, त्याचे काय? ओखी वादळापाठोपाठ केरळच्या कप्पड बीचजवळ समुद्रपातळीत 100 ते 200 मीटरची घट झाली आहे. प्रशासनाने मनाई करूनही तिकडे बघ्यांची गर्दी होतेय. अजून त्सुनामीची कुठलीच सूचना नसली, तरी निसर्गाच्या अशा अगम्य खेळांचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्याची हौस भयंकर परिणामांना जन्म देऊ शकते, याचीही जाणीव असायला हवी. पुढच्या मागच्या परिणामांचा विचार न करता केलेला विकास काय किंवा नसत्या उठाठेवी काय, दोन्ही सारखेच. आगामी धोक्यांची जाणीव असूनही त्याप्रति दाखवलेली ही बेपर्वाई कोणत्याही त्सुनामीच्या लाटांशिवायही आपल्याला बुडवू शकते. ओखीहून अधिक तीव्रतेने आपल्याला उद्ध्वस्त करू शकते. ओखीचे नामकरण बांग्लादेशने केले आहे. ओखी या शब्दाचा अर्थ होतो डोळे. अजूनही शांत असलेल्या निसर्गातील विध्वंसक शक्तींचा संदेश घेऊन, आज हे वादळ आपल्या किनार्‍यावर दाखल झाले आहे. हा किनारा कुठल्याही देशाची भौगोलिक सीमा नसून मानव जातीच्या अस्तित्वाचा किनारा आहे. आपणच ओढवून घेतलेल्या या संकटाकडे बघताना, आपल्या डोळ्यांवरची तथाकथित प्रगतीची झापडं बाजूला काढून ठेवण्याची गरज आहे. वादळापूर्वीची शांतता कधीच संपली, आता वादळानंतर तरी शहाणपण अंगी बाणवण्याची वेळ आली आहे.

सृष्टी गुजराथी
मुक्त पत्रकार, लेखिका, खारघर, मुंबई