जळगाव । रविवारी 7 मे रोजी झालेल्या वादळामध्ये नांद्रे बुद्रुक व पिलखेडा ता.जळगाव येथील अनेक शेतकर्यांचे शेत उभ्या पिकांसह जमिनदोस्त होवून उद्ध्वस्त झाले. शेतकरी नरेश नवाल यांच्या सात एकर शेतजमिनीत लावलेली सुमारे 8 हजार केळीची बाग ही ऐन कापणीवर आलेली असतांना कालच्या वादळामध्ये जमिनदोस्त झाली. एक्सपोर्ट क्वालिटीची शेतातील केळी उत्पादन हे नियोजीत ठरल्यानुसार चार दिवसांनी व्यापार्याला माल द्यावयाचा होता मात्र आलेल्या वादळामुळे सर्व नुकसान झाले आहे, अशी माहिती शेतकरी नरेश नवाल यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
पंचनामा झाला, आता आस मदतीची
सर्व साधारण 30 किलोचे घड अशी उत्तम रास येण्यासाठी श्री. नवाल यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्या-त्या वेळी 3 लाख रुपये कर्ज घेतले होते. या शेती मशागतीवर व या पिकासाठी 7 लाख 15 हजार रुपयांचा खर्च पडला होता आणि या आठवड्यात सुमारे 12 ते 14 लाख एवढे उत्पन्नाची बाग ही जमिनदोस्त झाली. दुर्देव म्हणजे याच शेतकर्याचे गावात असलेले घरसुध्दा वारावादळामुळे जमिनदोस्त झाले. सर्व पत्रे उन्मळुन पडले, भिंती कोसळल्या त्यामुळे तेथेही सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले आणि घराचा पंचनामा तलाठी सारिका दुर्गुडे यांनी केला. नेमके आजुबाजुचे सर्व शेत रिकामे असल्यामुळे वादळाचा तडाखा याच शेताला मोठ्या प्रमाणात बसला असल्याचे नमूद केले आहे.