वादळी खेळाडू ख्रिस गेलने केला नवा विक्रम

0

राजकोट । ख्रिस गेल नावाचे तुफान काल गुजरातच्या संघाविरुद्ध पुन्हा समोर आले. गेल नावाच्या वादळाने टी-20 मध्ये आपल्या नावावर अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यामध्ये गगनचुंबी षटकार ठोकण्याची कला असो वा जबरदस्त स्ट्राईक रेटने खेळणे असो. गेलने कालच्या खेळीनंतर पुन्हा एकदा नवा इतिहास रचला आहे. आयपीएल सामन्यादरम्यान टी-20 मध्ये 10000 धावा पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज
ठरला आहे.

गेलच्या नावे अनेक विक्रम
राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरुचा स्फोटक फलंदाज असलेल्या ख्रिस गेलने गुजरात लायन्स विरुद्धच्या सामन्यात हा विक्रम केला. गुजरात लायन्स विरुद्ध खेळताना 37 वर्षीय ख्रिस गेलने तीन धावा काढून आपल्या टी-20 च्या कारकिर्दितील 10000 धावांचा टप्पा गाठला आणि विश्वविक्रम आपल्या नावावर केला. टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारण्याचा विक्रम आयपीएलमध्ये केला होता.

20 संघाकडून खेळला क्रिकेट
टी-20 क्रिकेटमध्ये ख्रिस गेल आत्तापर्यंत जवळपास 20 संघाकडून खेळला आहे. यामध्ये बारिसाल बुल्स, बारिसाल बर्नर्स, चटगांव विकिंग्स, ढाका ग्लॅडिएटर्स, जमैका, जमैका टलवाह, कराची किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, लाहोर कलंदर, लायन्स, मॅटाबेलेलॅन्ड टस्कर्स, मेलबर्न रेनगेड्स, पीसीए मास्टर्स, रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरु, समरसेट, स्नॅनफोर्ड सुपरस्टार्स, सिडनी थंडर, वेस्ट इंडियन्स, वेस्ट इंडिज आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या संघांचा समावेश आहे. सध्या तो आयपीएलमध्ये बंगळुरूच्या संघाकडून खेळत आहे.