रावेर तालुक्यात केळीचे सुमारे 40 कोटींचे नुकसान
रावेर- रावेर पूर्व भागात सायंकाळी जोरदार वादळी वार्यासह झालेल्या पावसाने तडाखा दिल्याने कापणीला आलेली केळी जमीनदोस्त झाल्याने शेतकर्यांचे सुमारे 40 कोटी रुपयांचे नुकसान झाले तर वादळामुळे धावत्या ट्रकवर झाड पडल्याने ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास रावेर-अंकलेश्वर महामार्गावर ही घटना घडली.
हजारो हेक्टरवरील केळी आडवी
शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला आणि रावेर तालुक्यातील भोकरी, निरुळ, पाडळे, अहिरवाडी, मोहगन, कर्जोत, के-हाळा, रसलपूरसह परीसरात अचानक पावसाला सुरुवात झाली आणि पाहता-पाहता निसर्गाने वादळात रूपांतर घेतले. अनेक झाडे उन्मळून पडली तर विद्युत ताराही तुटल्या. हजारो हेक्टर केळी आडवी झाल्याने शेतकर्यांना मोठा फटका बसला.
नुकसानग्रस्त भागाची तहसीलदारांकडून पाहणी
रावेर पूर्व भागातील अनेक शेतकर्यांची कापणीला आलेली केळी जमीनदोस्त झाली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या रुद्रवादळी रूपाने हिरावून घेतला यामुळे शेतकर्यांवर अस्मानी संकट कोसळलेले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी तहसीलदार विजय कुमार ढगे यांनी केली तसेच मयत ट्रक चालकाच्या नातलगाचे यावेळी सांत्वन केले.
रावेर-बर्हाणपूर मार्ग ठप्प
वादळामुळे रावेर ते चोरवड दरम्यान आठ ते नऊ मोठी झाडे पडल्याने महामार्ग सुमारे दोन तास ठप्प होता. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. दोन किलोमीटरपर्यंत वाहन व ट्रकांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबतचे वृत्त समजताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता तायडे आपल्या टीम सह घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावरील झाडे बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.
झाड पडल्याने ट्रक चालक ठार
बर्हाणपूरकडे रावेरच्या दिशेने येणार्या आयशर ट्रक (एम.एच.04 जीसी 4471) हा हॉटेल राजेश्वरीजवळ आला असता अचानक जोरदार वादळामुळे या ट्रकच्या कॅबिनवर लिंबाचे झाड़ पडून ट्रक चालक पृथ्वीराज प्रताप चव्हाण (23 रा.मुंबई) हा जागीच ठार झाला.