निवडणूकीच्या नावाखाली प्रशासनाची डोळेझाक
जळगाव: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी पावसामुळे शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत स्थानिक शेतकर्यांनी प्रशासनाकडे तक्रारी देखिल केल्या आहे. मात्र निवडणुकीच्या नावाखाली जिल्हा प्रशासनाने डोळेझाक केली असल्याने प्रत्याक्षात नुकसान किती? याची नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. प्रशासनाच्या या हलगर्जीपणावर शेतकर्यांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यात दि. 14 व 15 रोजी सर्वत्र वादळी वार्यासह पाऊस पडला. त्यात केळीबागा, कैर्या, लिंब आदींचे मोठे नुकसान झाले. मात्र जिल्हा प्रशासनाकडे गेल्या दोन दिवसांत या नुकसानीची माहितीच तालुका पातळीवरून पाठविली गेली नाही. त्यामुळे खुद्द प्रशासनाकडे नुकसानीची नोंद नसल्याचे उघड झाले आहे. जिल्ह्यात कुठेही नैसर्गिक नुकसान झाले, तरी दुसर्या दिवशी जिल्हा प्रशासनाला त्या नुकसानीचा अहवाल द्यावा लागतो. त्यात किती नुकसान झाले, जीवित हानी, जनावरांची हानी, शेतीपिकाचे नुकसान याबाबतच्या माहितीचा समावेश असतो. प्रशासनाकडे प्राप्त झालेला प्राथमिक अहवाल निवासी उपजिल्हाधिकारी नाशिक महसूल आयुक्तांना पाठवितात. नंतर एकत्रितपणे विभागाचा अहवाल मुंबईला पाठविला जातो. हा अहवाल कोतवाल, तलाठी, मंडलाधिकारी आपापल्या तालुक्याच्या तहसील कार्यालयात पाठवितात. नंतर तहसीलदारांच्या सहीने जिल्ह्याला पाठविला जातो. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात मतदान यंत्रे सीलिंगची कामे सुरू आहेत. यामुळे सर्वच कर्मचारी या कामात आहेत. त्यांना आपल्या गावात, तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाचे नुकसान, पाऊस यांची माहिती देण्याचा जणू विसरच पडला आहे. जिल्हा प्रशासनाच्या या गलथान कारभाराबद्दल शेतकर्यांमधुन तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात तुरळक पाऊस
शहरात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर, शिव कॉलनी, गणेश कॉलनी, महाबळ परीसर, जिल्हापेठ परिसरात पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरीकांची धांदल उडाली होती.