वादळी वार्‍याने कोट्यवधींचे हानी ; 16 गावांमध्ये केळीचे प्रचंड नुकसान

0

महसूल प्रशासनाकडून पंचनाम्यांना सुरुवात ; लोकप्रतिनिधींनी केली पाहणी

रावेर- रावेर शहर व तालुक्यात शुक्रवारी झालेल्या वादळी वार्‍यामुळे शेकडो हेक्टरवरील केळी आडवी झाल्यानंतर नुकसानीची पाहणी तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह अधिकार्‍यांनी केली तर पंचनाम्यांनादेखील सुरुवात झाली आहे. प्रशासनाने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबतच तातडीने शेतकर्‍यांना भरपाई देण्यासाठी दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रावेर पूर्व भागात वादळी वार्‍यासोबत पावसामुळे हजारो हेक्टर केळी आडवी झाली होती. आधीच विविध संकटांनी घेरलेल्या शेतकर्‍यांवर अस्मानी संकट कोसळल्याने त्यांचे मनोबल खचले आहे. शनिवारी नुकसानग्रस्त भागाची महसूल विभागातर्फे पाहणी करण्यात आली तर पंचनाम्यांनादेखील सुरुवात करण्यात आली.

या गावांना सर्वाधिक फटका
तालुक्यातील सिंदखेडा, मुंजलवाडी, रसलपुर, बक्षीपूर, खिरोदा, केर्‍हाळा, भोकरी, वाघोड, कर्जोद, अहिरवाडी, पिंप्री जूनोने, पाडळे, निरुळ या गावांना सर्वाधिक वादळाचा फटका बसला आहे.

लोकप्रतिनिधींनी केली पाहणी
शनिवारी आमदार हरीभाऊ जावळे, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी शिक्षण सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पाटील, प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार विजयकुमार ढगे, कृषी अधिकारी सुधाकर पवार आदींनी भेट देवून पाहणी केली. राजीव पाटील, सरपंच राहूल पाटील, विशाल पाटील, महेश पाटील, मिलिंद पाटील आदी शेतकरी उपस्थित होते. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पंचनाम्यांच्या कामांना वेग दिला आहे.

तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी
रावेर पूर्व भागावरील शेतकर्‍यावर आलेले अस्मानी संकट विदारक असून शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावीतसेच पीक विमा कंपनीने मागील झालेल्या नुकसानीचीही भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केली.