वादळी वार्‍यामुळे केळीच्या बागा पडल्या आडव्या

0

भुसावळ। भुसावळसह परिसरात सोमवार 12 रोजी रात्री वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे शेतीपिकांसह घरांवरील पत्रे उडाल्यामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. रावेर, मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या बागा वादळी वार्‍यामुळे आडव्या पडल्या तर भुसावळ तालुक्यातील चोरवड जिल्हा परिषद शाळांचे पत्रे उडाले तर शहरातील अनेक घरांवरील पत्रे उडाले. तसेच वीज तारा तुटल्याने नागरिक रात्रभर अंधारात राहिल्याने प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागला़. भुसावळ शहरात रात्री नऊ वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली़ पावसाच्या प्रारंभी सोसाट्याचा वारा वाहण्यास सुरुवात झाली. नंतर वादळाला सुरुवात झाल्यानंतर शहरातील यावल रोडवरील राहुल नगरातील अनेक घरांवरील पत्रे उडाली़. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही़. गेल्या 24 तासात 5़6 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची केंद्रीय जल आयोगाच्या सूत्रांनी सांगितल़े

केळीच्या बागा मातीमोल
वादळी वार्‍याचा सर्वाधिक फटका रावेर तालुक्यात केळीला बसला़ तालुक्यातील अटवाडे, खानापूर, अजनाडे आदी भागातील बांधावरील केळी वादळी वार्‍यामुळे आडवी पडल्याने शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल़े शेत-शिवारातील अनेक झाडे आडवी झाली असून रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांचे चांगलेच झाल़े मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळे परिसरातही केळी पट्ट्यातही वादळाने केळी आडवी पडल्याने शेतकर्‍यांना मोठा फटका बसला़.

दूरध्वनी सेवा विस्कळीत
नगरपालिका आवारातील वृक्ष कोसळल्यामुळे येथील कपांऊंडची जुनी दगडी भिंत देखील तुटली आहे. तसेच शहर पोलीस ठाण्याजवळील झाड उन्मळल्याने कंट्रोल रुमची सेवा प्रभावीत झाली तर तहसीलच्या सेतु सुविधा केंद्राचे कामही ठप्प झाल़े. बीएसएनलच्या तारा तुटल्यामुळे दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली आह़े

शाळांची उडाली पत्रे
तालुक्यातील चोरवड येथील जिल्हा परिषद शाळांचे वादळी वार्‍याने पत्रे उडाले तर शहरातील अनेक भागातील वीज तारा तुटल्याने मध्यरात्रीपर्यंत शहरवासी अंधारात होत़े.

23 गावे रात्रीपासून अंधारात
मुक्ताईनगर तालुक्यात देखील वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाने झोडपून काढल़े यामुळे तालुक्यातील 23 गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. वादळामुळे नायगाव शिवारात काही शेतकर्‍यांच्या अवघ्या शेतातील पूर्ण केळीबागा आडव्या पडल्याने जबर नुकसान झाले आहे तर अंतुर्ली वीज उपकेंद्राचे मुख्य वीवाहिनी खांब पडल्याने 23 गावे रात्रीपासून अंधारात आहेत़. वादळी वार्‍यामुळे एका-एका शेतात किमान चार हजार तर कमाल 12 हजार केळीची झाडे वादळाने आडवी पडली आहेत. तर अनेक शेतात कमी अधिक प्रमाणात केळी पीक वादळाच्या तडाख्यात सापडल़े. अनेक ठिकाणी रात्री 8.30 ते 9.30 दरम्यान वादळी पाऊस सुरू होता यात नागरी वस्त्यांसह शेती शिवारात वीज खांब पडलेत़ अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडाली आहेत़ सुकळी येथील माध्यमिक शाळेच्या वर्ग खोल्यांची पत्रे उडाली़ रात्रीपासून अंतुर्ली 33 केव्ही वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरातील 23 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला़.