वादळ बाधित सर्व शेतकर्‍यांना मिळणार मदत

0

आमदार हरीभाऊ जावळे यांच्या अटल महा कृषी कार्यशाळेचे फलित

फैजपूर- अटल महाकृषी कार्यशाळेत आमदार हरीभाऊ जावळे यांनी पालकमंत्री तथा कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तालुक्यातील वादळ व गारपीटग्रस्त केळी उत्पादक सर्व शेतकर्‍यांना त्वरीत मदत मिळण्याची तसेच करपा रोगाचे उच्चाटन करण्यासाठी अनुदानावर औषधी पुरवण्याची मागणी केली होती. या मागणीची पालकमंत्री पाटील यांनी दखल घेत 3 ऑक्टोबर 2018 रोजी आयोजित मंत्री परीषदेत तालुक्यातील वादळ व गारपीट ग्रस्त केळी उत्पादक शेतकर्‍यांना मदत देण्याचा निर्णय घेतला तर 10 ऑक्टोबर रोजी त्याबाबत शासन आदेश निर्गमित करण्यात आला. शासन निर्णयानुसार फळपीक विमा असलेल्या व नसलेल्या सर्व शेतकर्‍यांना शासकीय मदत दिली जाणार आहे तसेच विमा असलेल्या शेतकर्‍यांनाही विमा रकमेसह शासनाची प्रती हेक्टरी 13 हजार 500/- रुपये मदत दिली जाईल तसेच फळ पिक विमा नसलेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या परीसरातील फळपिक विमा असलेल्या शेतकर्‍यांना ज्या दराने नुकसान भरपाई मिळेल त्याच्या 50% रक्कम अधिक प्रती हेक्टरी 13 हजार 500 रुपये मदत शासनाने मंजूर केलेली आहे. तसेच ही मदत कोणत्याही बँकेने कर्ज खाती जमा न करता ती शेतकर्‍याच्या बचत खात्यात जमा करण्यात यावी असेही शासन आदेशात नमूद आहे. आमदार जावळे यांनी करपा उच्चाटन साठीच्या केलेल्या आग्रही मागणीसही चंद्रकांत पाटील यांनी संमती दिली आहे. करपा उच्चाटन प्रकल्प अंतर्गत अनुदानित औषधी वितरणासाठी तत्काळ प्रस्ताव पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना देण्यात आले आहेत.