सध्या तामीळनाडूतील राजकीय स्थिती एका संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. जवळपास पाव शतकापर्यंत या राज्याचे राजकारण करुणानिधी आणि जयललिता यांच्याभोवतीच फिरत होते. दुर्दैवाने जयललिता यांचा अकस्मात मृत्यू झाला असून, करुणानिधी हेदेखील वार्धक्याने गलितगात्र झाले आहेत. जयललितांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अण्णाद्रमुक पक्षातील यादवी सध्या तरी मिटल्याची चिन्हे असली, तरी या पक्षात सारेच काही आलबेल असल्याचे म्हणता येणार नाही. दुसरीकडे करुणानिधी यांच्या कुटुंबातील सत्तासंघर्षही असाच वरवर मिटल्याची चिन्हे असली, तरी आतून बरेच काही खदखदत आहे. या स्थितीचा लाभ घेण्यासाठी काँग्रेस आणि भाजपचा प्रयत्न सुरू असले, तरी त्यांच्या वाढीला खूप मर्यादा असल्याचे स्पष्ट आहे. एक तर तब्बल पाच दशकांपासून काँग्रेसला तेथे सत्ता मिळवता आलेली नाही, तर भाजपने खूप प्रयत्न करूनही चंचूप्रवेशाच्या पलीकडे या पक्षाला स्थान नसल्याचे दिसून आले आहे. अर्थात भाजप आणि काँग्रेस या दोन प्रमुख राष्ट्रीय पक्षांना धुडकावून लावणार्या तामीळनाडूवर जयाअम्मा आणि करुणानिधी यांच्या पश्चात कोण अधिराज्य गाजवणार? हा सर्वांच्याच कुतूहलाचा प्रश्न आहे. नेमक्या याच संधीचा लाभ घेण्यासाठी तामीळनाडूत रजनीकांत आणि कमल हसन हे दोन मातब्बर समोर येण्याची शक्यता आहे. रजनीकांत यांच्या राजकारणातील प्रवेशाची तर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू असली, तरी याबाबत आपले पत्ते खुले केलेले नाहीत. दुसरीकडे कमल हसन यांनी मात्र काही महिन्यांपूर्वी राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत देत आता उघडपणे मैदानात उतरण्याची तयारी केल्याचे दिसून येत आहे. अर्थात जयललिता आणि करुणानिधी यांच्याप्रमाणेच पुढील कालखंडात तामीळनाडूच्या राजकीय आखाड्यात कमल हसन विरुद्ध रजनीकांत असा सामना रंगणार का? याचीच आता सर्वांना उत्सुकता लागली आहे. यातील हसन यांनी आपल्या एका वादग्रस्त लेखाच्या माध्यमातून हात घातला आहे.
तामीळनाडूत अनेक पदर आहेत. तेथील जनतेला आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा प्रखर अभिमान आहे. यामुळे ते आपल्याला तामीळ देशाचे नागरिक समजतात. उत्तरेतील आर्य आणि दक्षिणेतील द्रविड यांच्यातील संस्कृतीमधील टोकाचा संघर्ष आपल्याला या राज्यात आढळून येतो. उत्तर भारतीयांच्या हिंदी भाषेसह त्यांच्या संस्कृतीचा आणि विचारधारेचा येथे प्रखर विरोध केला जातो. रामासामी पेरियार यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच या वर्चस्वाला आव्हान देत तामीळ अस्मितेचा नारा बुलंद केला होता. यातूनच द्रविडवादाची चळवळ आकारास आली. आज तामीळनाडूतील सर्व राजकीय पक्ष यातूनच पुढे आले आहेत. यामुळे कमल हसन हेदेखील हाच राजमार्ग चोखाळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, त्यांनी मध्यंतरी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेत वेगळ्या मार्गाची चाचपणी केली. यातून सुरू असणारी चर्चा विरत नाही तोच आनंदा विकटन या विख्यात तामीळ मासिकात एका लेखाच्या माध्यमातून त्यांनी हिंदू दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला आहे.
यूपीए सरकारच्या कालखंडात पहिल्यांदा हिंदू दहशतवाद या संकल्पनेवर चर्चा सुरू झाली होती. यावर प्रमुख राजकीय नेत्यांनी चुप्पी साधली असली, तरी दिग्विजय सिंग आणि लालूप्रसाद यादव यांच्यासारख्या नेत्यांनी यावरून वारंवार भाजप आणि संघावर धारदार टीका केली होती. 2014च्या निवडणुकीच्या निकालातून हा मुद्दा काँग्रेसससह विरोधी पक्षांना खूप अडचणीत आणणारा ठरल्याचे मानले जात होते. यामुळे अलीकडे याबाबत कुणी फारसे बोलताना दिसत नसताना कमल हसन यांनी याला उपस्थित केल्याची बाब लक्षणीय मानली जात आहे. म्हणजेच त्यांनी तामीळ वा व्यापक दृष्टीने द्रविड अस्मितेला स्पर्श करण्याआधी थेट हिंदू दहशतवादाचा राष्ट्रीय मुद्दा हाती घेतला आहे. खरं तर हिंदू वा भगवा दहशतवाद हा शब्द संघ, भाजप आणि भाजप परिवारातील सर्व संघटनांना अस्वस्थ करत असल्याचे आधीच आढळून आले आहे. यामुळे यालाच हाती घेतल्यामुळे कमल हसन हे थेट भाजपलाच आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आज दिसून येत आहे. अर्थात राज्यात द्रमुक आणि अद्रमुक यांना आव्हान देत स्वत:चे स्थान निर्माण करताना राष्ट्रीय राजकारणात भाजपला आव्हान देण्याची भाषा कमल हसन करत असल्यामुळे राजकीय निरीक्षकांचे कुतूहल नक्कीच चाळवले गेले आहे.
कमल हसन यांनी गेल्या महिन्यातच आपण आयुष्यात रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका निभावल्या असल्या, तरी राजकारणात यापेक्षा वेगळा रोल असेल असे एका मुलाखतीत सांगितले होते तसेच आपला राजकारणातील रंग भगवा नसेल असे त्यांनी स्पष्ट केले होते. यातच त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचीही त्यांनी भेट घेतली. यामुळे कमल हसन हे डाव्या पक्षांसोबत जाणार का? अशी चर्चा सुरू होती. तथापि, त्यांनी डाव्या व्या उजव्या विचारसरणीत न अडकता आपण मध्यम मार्ग पत्करणार असल्याचे असल्याचे लागलीच स्पष्ट करून या दाव्यातील हवाच काढून टाकली. आता ताज्या माहितीनुसार 7 नोव्हेंबर रोजी अर्थात आपल्या वाढदिवसाला कमल हसन हे स्वतंत्र राजकीय पक्ष जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यांची वाटचाल वाटते तितकी सोपी नक्कीच नसेल. हसन यांच्यापाठोपाठ रजनीकांत यांनीदेखील स्वतंत्र राजकीय मार्ग निवडला तर तामीळनाडूतील स्थिती खूप मनोरंजक होणार आहे. अर्थात हा सर्व जर-तरचा प्रश्न आहे. मात्र, राजकारणात प्रवेशाआधी त्यांनी देश पातळीवर खळबळ उडवून देण्यासाठी निवडलेला मार्ग हा भाजपला खिजवणारा ठरला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपतर्फे सुब्रमण्यम स्वामी यांनी कमल हसन यांच्यावर टीका करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, हसन यांच्या या वक्तव्याचे व्यापक पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विशेष करून गुजरात आणि हिमाचल प्रदेशातल्या निवडणुकांचा प्रचार ऐन शिगेला पोहोचण्याआधी त्यांनी एक वादग्रस्त मुद्दा चव्हाट्यावर आणला, हे मात्र निश्चित.