वादाची उंची घटली; एव्हरेस्टची वाढली!

0

डॉ.युवराज परदेशी:

जगातले सर्वांत उंच शिखर म्हणून ख्याती असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिलेला आहे. 1847 पासून या शिखराचे अचूक मोजमाप करण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र, नैसर्गिक बदलांमुळे, हीमस्खलन, भूकंपामुळे एव्हरेस्टच्या उंचीत नेहमीच कमी अधिक बदल झाला. एव्हरेस्टची उंची मोजण्याचा आतापर्यंत अनेक देशांनी प्रयत्न केला. चीन, नेपाळ, अमेरिका, इटली अशा अनेक देशांनी माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली. मात्र, भारताने 1954 साली मोजलेल्या उंचीला बहुतांश देशांनी मान्यता दिली आहे. भारताने माऊंट एव्हरेस्टची उंची ही 8848 मीटर म्हणजेच 29028 फूट असल्याचे 1954 साली सांगितले होते. ही मोजणी करण्यासाठी भारताने त्रिकोणमितीचा वापर केला होता. त्यानंतरही कित्येक दशके वादाचा मुद्दा ठरलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची शेवटी निश्चित करण्यात आली आहे. नेपाळ आणि चीनने संयुक्तपणे मोजमाप केलेल्या या शिखराची उंची 8848.86 मीटर असल्याचे दोन्ही देशांनी जाहीर केले आहे. यापूर्वीच्या मोजमापापेक्षा एव्हरेस्टची उंची 86 सेंटीमीटरने वाढली आहे.

जगातल्या प्रत्येक गिर्यारोहकाचे स्वप्न असलेल्या माऊंट एव्हरेस्टची उंची हा चर्चेचा विषय असतो. शारीरिकदृष्ट्या मजबूत असलेली व्यक्ती एव्हरेस्ट शिखर सर करू शकत नाही तर मानसिकदृष्ट्या मजबूत असलेली व्यक्तीच एव्हरेस्ट सर करू शकते. 1953 ला सर एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी प हिल्यांदा एव्हरेस्ट ला गवसणी घातली. त्यानंतर अनेकांनी या उंच शिखराला सर केले आहे. आजवर 4000 पेक्षा जास्त गिर्यारोहकांनी जगातील सर्वात उंच असे एवरेस्ट शिखर सर केले आहे. जगातला हा सर्वोच्च पर्वत नेपाळ आणि चीन या दोन देशांमध्ये पसरला असला तरी त्याचे शिखर हे नेपाळच्या हद्दीत येते आणि हे शिखर सर करण्यासाठी दोन्ही देशांच्या बाजूंनी चढाई करता येते. एव्हरेस्ट हा जेंव्हा आकर्षणाचा विषय ठरला तितकाच वादाही मुद्दा ठरला आहे. नेपाळमध्ये 2015 मध्ये झालेल्या महाभयंकर भूकंपामुळे एव्हरेस्टची उंची कमी झाली असल्याचा दावा करण्यात येत होता. या भीषण भूकंपामुळे एव्हरेस्टवर मोठा परिणाम झाला असण्याची शक्यता काही भूशास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती.

7.8 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे नेपाळमध्ये 9,000 जणांचा बळी गेला होता. तर या भूकंपामुळे आलेल्या अ‍ॅव्हलांश – हिम स्खलनामुळे एव्हरेस्ट बेस क ॅम्पचा काही भाग गाडला जाऊन त्यात 18 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. या भूकंपामुळे एव्हरेस्टचं बर्फाच्छादित टोक आकुंचन पावले असण्याची शक्यता काही भूशास्त्रज्ञांनी व्यक्त केली होती. या भूकंपानंतर काठमांडूच्या उत्तरेकडे असणारी आणि या भूकंपाच्या केंद्राच्या जवळ असणार्‍या लांगटांग हिमल सारख्या हिमालयातल्या पर्वत शिखरांची उंची जवळपास एक मीटरने कमी झाल्याचे संशोधकांना आढळले होते. या नैसर्गिक संकटामुळे भूगर्भात बरीच उलथापालथ झाल्याने एव्हरेस्ट शिखराची आताची सर्वमान्य उंची कायम राहिली असेल की नाही, या शंकेने नेपाळ सरकारला घेरले. पर्वतावरच्या बर्फाच्छादित टोकाची उंची मोजण्याच्या पद्धतीवरून चीन आणि नेपाळचे एकमत होत नव्हते. माऊंट एव्हरेस्टची उंची मोजताना जिथपर्यंत या पर्वताचा खडक आहे तिथपर्यंतच याची मोजदाद करण्यात यावी असे आतापर्यंत चीनचे म्हणणे होते. तर या उंचीमध्ये पर्वताच्या बर्फाच्छादित शिखराचाही समावेश करावा असे नेपाळी अधिकार्‍यांचे म्हणणे होते. त्यानंतर उंचीचा वाद संपुष्टात आणण्यासाठी चीन-नेपाळने पुन्हा एकदा उंची मोजण्याचे काम हाती घेतले. चीनने 30 सदस्यांचा समावेश असलेल्या सर्वेक्षण पथकाला उंची मोजण्याचे काम दिले होते. हे चिनी पथक माउंट चोमोलुंगमा बेस कॅम्पहून एव्हरेस्टवर गेले होते. शिखर सर केल्यानंतर त्यांनी ग्लोबल सॅटेलाइट यंत्रणेच्या मदतीने उंची मोजली. या पथकात व्यावसायिक गिर्यारोहक आणि चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाच्या सर्वेक्षण अधिक ार्‍यांचा समावेश होता.

आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार, डोंगरांची उंची मोजताना ती समुद्र सपाटीपासून मोजली जाते. असे केल्याने डोंगराचा तळ नेमका कोणता हे ठरवण्यापेक्षा त्याचे शिखर नेमके किती उंच आहे, यावर लक्ष केंद्रित करता येते. एव्हरेस्टची मोजतात करताना नेपाळने बंगालच्या उपसागराची पातळी ही समुद्रसपाटीची पातळी म्हणून वापरली. पण भारत – नेपाळ सीमेलगत एव्हरेस्टच्या जवळच असणार्‍या एका जागेची उंची, भारताने हीच समुद्रसपाटी पाया धरत मोजलेली होती. त्यामुळे नेपाळी सर्वेक्षकांना या बिंदूपर्यंतची उंची मिळाली. तर चीनच्या सर्वेक्षण अधिकार्‍यांनी एव्हरेस्टची उंची मोजताना त्यांच्या पूर्वेकडच्या शांडाँग प्रांताजवळच्या पीत समुद्राची पातळी ही पाया – समुद्रसपाटी धरली.

शिखराची उंची मोजण्यासाठी दोन्ही देशांच्या सर्वेक्षकांनी त्रिकोणमितीचे सूत्रे वापरले. पाया आणि अंशाचा गुणाकार करून त्रिकोणाची उंची काढण्याचे सूत्रे यात वापरण्यात आले. यामुळे आता एव्हरेस्टच्या उंचीचा वाद संपुष्टात आला आहे. यामुळे कोरोनाचे संकट संपताच एव्हरेस्टकडे पर्यटकांचा ओढा वाढेलच! ही आनंदाची बाब आहे. ‘के2’ हे दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर असून हे शिखर चीन व पाकिस्तान यांच्या सीमारेषेवर आहे. युरोपमध्येही काही सर्वोच्च उंच शिखरे आहेत. यात माऊंट एल्ब्रस (5,642 मीटर, कॉकेशस पर्वतराजीत स्थान), मॉण्ट ब्लांक (4,808 मीटर, आल्प्स पर्वतराजीत स्थान), माऊंट मॅटरहॉर्न (4,478 मीटर, आल्प्स पर्वतराजीत स्थान) यांचा उल्लेख करावा लागेल. असे असले तरी गिर्यारोहकांची पहिली पसंती एव्हरेस्टच राहिला आहे.

एव्हरेस्ट सर करण्याची इच्छा असणार्‍या गिर्यारोहकांच्या संख्येत गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकदा गिर्यारोहकांच्या मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत. गिर्यारोहकांच्या मृत्यूचे एक कारण म्हणजे गिर्यारोहणाचे झालेले व्यावसायिकरण हे ही मानले जाते. माउंट एव्हरेस्ट पर्यटनाच्या नावाने अनेक लोकांना गिर्यारोहण करण्यासाठी आकर्षित केले जाते, त्यामुळे तिथे ‘टॅफिक जाम’ची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे येथे होणार क चरा हा देखील तितकाच गंभीर व चिंतेचा विषय ठरला आहे. पर्यटकांनी एव्हरेस्ट सर करण्याचे आव्हान जरुर स्विकारावे मात्र त्याच वेळी या निसर्ग सौदर्यांला जपण्याची काळजीही घ्यावी, एवढीच माफक अपेक्षा आहे.