नवी दिल्ली : डोकलाम सीमारेषेवरून निर्माण झालेला वाद अखेर कोणतेही युद्ध न होताच मिटला आहे. दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेत, या वादावर तोडगा काढला. दोन्ही बाजूचे सैन्य या सीमेवर मात्र पेट्रोलिंग करणार आहेत. 21 ऑगस्टरोजी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आम्हाला शेजारी राष्ट्रांशी चांगले संबंध हवे असून, लवकरच हा वाद मिटेल, असे सांगितले होते. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रस्तावित ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीपूर्वी हा वाद मिटविण्यासाठी राजनयिक पातळीवर चर्चा सुरु होती. पुढील 70 दिवस ‘नो वार, नो पीस‘ ही भूमिका या दोन्ही देशांनी राजनयिक पातळीवर ठरवली आहे. दरम्यान, भारताने आपले सैन्य माघारी बोलविले असले तरी, चीनने त्यांचे सैन्य अद्याप मागे घेतले नसल्याचे दिसून आले आहे. या भागात चीनची गस्त सुरुच राहील, असे चीनच्या प्रवक्त्याने सांगितले. सूत्राच्या माहितीनुसार, 16 जूनपूर्वीची परिस्थिती ठेवण्याबाबत दोन्ही देशांत एकमत झाले आहे.
चर्चेला मोठे यश
दोन महिन्यांपासून दोन्ही देशांचे सैन्य डोकलाम परिसरात ठाण मांडून होते. त्यामुळे सीमेवर तणाव निर्माण झाला होता. 6 जूनरोजी चीनने बुलडोझरचा वापर करुन भारतीय बंकर नष्ट केले होते. यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चा सुरु होती. या चर्चेत भारताला मोठे यश मिळाले असून, चर्चेअंती दोन्ही देशांनी डोकलाममधून सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला.
भारतीय सैन्याने माघार घेतली : चीन
भारत आणि चीनने डोकलाममधील सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतल्याचे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जाहीर केलेे असले तरी, भारताचा हा दावा चुकीचा असून, भारतीय सैन्य डोकलाममधून माघारी परतले आहे. मात्र चिनी सैन्याकडून डोकलाममध्ये गस्त घालण्याचे काम सुरूच राहील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. दोन्ही देशांकडून सैन्य मागे घेतले जाणार असल्याचे भारताने जाहीर करताच, चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून हे विधान करण्यात आल्याने सद्यातरी सैन्य माघारीबाबत संभ्रम दिसत आहे.