वाबळेवाडीत जुन्नर विज्ञान अध्यापक संघाची शैक्षणिक भेट

0

जुन्नर । तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या सदस्यांनी शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या सदस्यांनी शैक्षणिक भेट देऊन उपक्रमांची माहिती घेतल्याचे अध्यक्ष रतिलाल बाबेल यांनी सांगितले.जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक सहली, विज्ञान जत्रा, वैज्ञानिक स्थळांना भेटी, वैज्ञानिक चर्चा सत्र, वैज्ञानिकांशी संवाद असे उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने तालुक्यातील सदस्यांनी नुकतीच शिरूर तालुक्यातील वाबळेवाडीच्या डिजिटल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देऊन तेथील मुलांची हितगुज केले गप्पागोष्टी केल्या व शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली. या भेटीमध्ये जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रतिलाल बाबेल, उपाध्यक्ष वाय.बी. दाते, सचिव टी.आर. वामन, सदस्य ज्ञानेश्‍वर केंद्रे, प्रवीण ताजणे, गहिनीनाथ बढे आदींचा समावेश होता.

शाळेत बाग, सुधारित इमारत बांधकाम, फर्निचर, सोलर सुविधा, एलईडी प्रोजेक्टर, इंटरनेटसाठी वायफाय यंत्रणा, पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर, गांडूळखत प्रकल्प, चांगल्या दर्जाचे स्वच्छतागृह, किचन शेड, हजारो पुस्तकांचे वाचनालय, विज्ञान प्रयोग शाळा आदी उपक्रमांची माहिती स्वतः विद्यार्थ्यांनी जुन्नर तालुक्यातील शिक्षकांना दिली. बोलकी शाळा व चुणचुणीत विद्यार्थी पाहून आम्ही विज्ञान शिक्षक अगदी भारावून गेलो असल्याचे सचिव टी.आर.वामन यांनी सांगितले.

टॅबलेट शाळा म्हणून राज्यात ओळख
आधुनिक शिक्षण पद्धतीबरोबरच अपारंपरिक ऊर्जेचा वापर व पर्यावरण समृद्ध शाळेचे अनोखे मॉडेल सादर केल्यानेआंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001-2008 हे मानांकन शाळेला प्राप्त झाले असून टॅबलेट शाळा म्हणून राज्यात बहुमान मिळालेला आहे अशी माहिती मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे यांनी दिली.