वायफाय सुविधेमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत झाली चाळीस टक्क्यांनी वाढ!

0

पुणे । ‘वायफाय’ सुविधेमुळे एसटी महामंडळाला चांगला फायदा होत असल्याचे दिसुन येत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एसटीने वायफाय सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे प्रवालांच्या संख्येत 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. तसेच प्रवाशी संख्येबरोबरच एसटीच्या उत्पन्नातदेखील वाढ झाली आहे.बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद घेऊन एसटी महामंडळाने गावावागावांत आणि खेड्यापाड्यातही आपली सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले. तसेच नवनविन संकल्पना राबवून नेहमी प्रवाशांना खुश ठेवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. शहरी ग्रामिण भागात एसटीने चांगले जाळे निर्माण केले असुन प्रवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने देखील एसटी महामंडळ काळजी घेते. त्यामुळेच एसटीने प्रवाशांचा विश्‍वास संपादन करण्यात यश मिळविले आहे.

सर्वच बसेसमध्ये वायफाय सेवा
महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या संकल्पनेतून ‘एसटीचा प्रवास, मनोरंजन हमखास’ ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात महामंडळाच्या काही बसेसमध्ये वायफाय सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला, विशेष म्हणजे अल्पावधीतच या मोहिमेचा प्रभावी फायदा होउन प्रवासी संख्येत आणि पर्यायाने महसूलातही अपेक्षेपेक्षाही चांगलीच वाढ झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन जवळपास सर्वच बसेसमध्ये ही सुविधा पुरविण्यात आली आहे, त्यामुळे महामंडळालादेखील फायदा झाला आहे.

आरामदायी बसेसमुळेही उत्पन्नात वाढ
खासगी बसेसमुळे स्पर्धेच्या युगात टिकून राहाण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या, त्यामध्ये महामंडळाला अपेक्षित यशही आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून महामंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शिवनेरी, हिरकणी आणि शिवशाही बसेस सुरु करण्यात आल्या. सर्वाधिक उत्पन्न मिळणार्‍या मार्गावर या बसेस सुरु करण्यात आल्या, विशेष म्हणजे या आरामदायी बसेसमुळेही उत्पन्नात वाढ झाली असून या बसेसमध्ये आणखी वाढ करण्याचा निर्णय महामंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे.

खाजगी बसेसशी स्पर्धा
एसटीच्याच दरात खासगी बसेसचे मालक दर्जेदार आणि आरामदायी सुविधा देत असल्याने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत महामंडळाची प्रवासी संख्या जवळपास निम्म्याने घटली होती. त्यातूनच महामंडळाच्या वरील कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढतच चालला होता. त्याची दखल घेऊन महामंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांच्या कालावधीत विशेष प्रयत्न करण्यात आले. त्याचे सकारात्मक परिनाम देखील दिसुन आले आहेत.