वायरने गळा आवळून तरुणाचा खून

0

तळेगाव – वायरने गळा आवळून तरुणाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आढे गावच्या हद्दीत टाकला. हा प्रकार गुरुवारी सायंकाळी उघडकीस आला. प्रकाश कोंडीबा निहाळ (वय 25, रा. चणेगाव, जि. जालना. सध्या रा. धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गजानन बाबुराव शिंदे (रा. धायरी) यांनी तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी अज्ञात इसमांनी प्रकाश याचा वायरसारख्या वस्तूने गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याचा मृतदेह पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आढे गावच्या हद्दीत पुलावरून फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच तळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या खुनातील आरोपी अज्ञात असल्याने या प्रकरणाचा तपास करणे हे तळेगाव पोलिसांसमोर कठीण आव्हान आहे. खून कोणी, कुठे व का केला याचा शोध तळेगाव पोलीस घेत आहेत.