भुसावळ। वीज बिल कमी करुन देण्यासाठी चार हजार रुपयांची मागणी करुन रक्कम स्विकारतांना महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या कांतीलाल नारायण गोसावी (वय 42) यांना लाचलुचपत विभागाच्या पथकाने निंभोरा येथे शुक्रवार 27 रोजी अटक केली. निंभोरा येथील स्टेट बँकेजवळील घरातील विद्युत उपकरणांची तपासणी करण्यासाठी वायरमन कांतीलाल गोसावी हे गेले असता उपकरणांची तपासणी झाल्यानंतर मंजूर असलेल्या विजभारापेक्षा जास्त विजेचा वापर केल्यामुळे पुढील महिन्यापासून जास्त वीज बिल आकारले जाईल.
बस स्थानकावर सापळा रचून केली अटक
जर जास्तीचे बिल नको असेल तर चार हजार रुपये द्यावे लागतील अन्यथा पुढील महिन्यापासून जास्तीचा वापर केल्यामुळे जास्त वीज बिलाची आकारणी करण्यात येईल, असे गोसावी यांनी संबंधित ग्राहकाला सांगितले. यासंदर्भात या ग्राहकाने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता 27 रोजी निंभोरा बसस्थानकाजवळ लाचलुचपत विभागाने सापळा लावला असता वायरमन गोसावी यांनी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी करुन ही रक्कम स्विकारतांना त्यांना रंगेहाथ
पकडण्यात आले.
निंभोरा पोलिसात गुन्हा
याबाबत त्यांचे विरुध्द निंभोरा पोलीस स्थानकात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लाचलुचपत विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहे. दरम्यान नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडण्याचे आवाहन लाचलुचपत विभागातर्फे केले आहे.