वायला येथील तरुणांचा सर्पदंशाने मृत्यू

0

पोलीस बनण्याचे स्वप्न राहिले अपूर्ण

मुक्ताईनगर : तालुक्यातील वायला येथील 17 वर्षीय तरुणांचा सर्पदंशाने 6 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर औरंगाबाद येथे रुग्णालयात मृत्यू झाला.
तालुक्यातील ईच्छापूर-निमखेडी बुद्रुक येथील ज्ञानपूर्ण विद्यालयात 11 वी कला वर्गात शिकणारा अश्विन लहुजी वाघ हा विद्यार्थी 14 नोव्हेंबर रोजी दुपारी कॉलेजमधून वायला येथे घरी गेल्यानंतर चुलत भाऊ भावेश सोबत घरच्या म्हशीला चरायला घेऊन गेला असताना दुपारी तीनच्या सुमारास त्याला मण्यार जातीच्या सापाने दंश केला. त्यास जळगाव येथील खाजगी इस्पितळात उपचारासाठी त्याच दिवशी दाखल केले मात्र त्याची प्रकृती खालावल्याने त्यास 17 रोजी औरंगाबाद येथे हलवण्यात आले. 6 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मात्र त्याची प्राणज्योत मालवली. अश्विन याला पोलीस दलात भरती व्हायचे होते व तशी तयारी देखील तो करत होता. सर्पदंशाच्या 1 दिवस आधीच त्याने लांब उडीसाठी वायला येथे एकट्याने खड्डा खोदला होतामात्र 6 च दिवसांनी त्याच्यावर काळाने झडप घातली. त्याच्या पाशात आई, लहान भाऊ असा परिवार आहे. अतिशय सुस्वभावी, अभ्यासू व मेहनती अश्विन च्या निधनाने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.