‘वायसीएमएच’च्या विभागप्रमुख वादावर अखेर पडदा पडला!

0

पिंपरी । महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाचे विभागप्रमुख आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय आणि अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्यामध्ये पदोन्नतीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. या दोघांच्या पदोन्नतीच्या वादामध्ये पदाधिकारी आणि अधिकार्‍यांमध्ये संभ्रमावस्था होती. उच्च न्यायालयाचा या प्रकरणाला स्टे असल्याने यावर भाष्य करणे चुकीचे आहे, असे विशेष सर्वसाधारण सभेमध्ये सांगण्यात आले होते. मात्र डॉ. रॉय हे कायद्यानुसार पदावर नसून, त्यांच्याकडे अजूनही चार्ज आहे, असे माध्यमांनी आयुक्तांना दर्शविले होते. मात्र एखाद्या अधिकार्‍याला विशिष्ट कालावधीपर्यंत नियुक्त केल्यावर त्याच्या मुदतवाढीचा फेरआदेश न काढता त्याला त्याच पदावर ठेवण्याची महापालिकेची प्रथा असल्याचे आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी सांगितले होते. हे प्रकरण अधिकच वाढल्याने आयुक्तांनी डॉ. रॉय यांच्याकडील विभागप्रमुखपद काढून डॉ. पवन साळवे यांच्याकडे सुपूर्द केले आणि या प्रकरणावर तात्पुरता पडदा टाकला आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांची या पदावर 28 एप्रिल 2016 पर्यंत प्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तत्कालीन आयुक्तांनी या संदर्भात दिलेल्या आदेशानंतर रॉय यांच्या नियुक्तीबाबत फेरआदेश काढणे आवश्यक असताना महापालिकेच्या प्रशासन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे लक्ष दिले नाही. त्यामुळे डॉ. रॉय हे 29 एप्रिल 2016 नंतर तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या या पदावर राहीले नसताना त्यांच्याकडे पदभार कसा असा सवाल माध्यमांनी केला होता. त्यावर आयुक्तांनी महापालिका प्रथेनुसार काम करते अशी प्राजंळ कबुली दिली.

आर्थिक व्यवहार झाल्याचाही संशय
महापालिकेचे कामकाज मुंबई महापालिका अधिनियम व सेवाशर्ती नुसार केले जाते. एखाद्या अधिकार्‍यांच्या नियुक्तीचा कालावधी संपत आला असेल तर पुन्हा आयुक्तांच्या आदेशाने त्याची फेरमुदतवाढ दिली जाते. मात्र महापालिकेत या सर्व बाबींना हरताळ फासून नियमांचे उल्लघंन केले आहे. या विषयांवरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गदारोळही झाला आहे. डॉ. रॉय यांच्याशी अनेकांचे लागेबांधे असल्याने त्यांना वाचवण्यासाठी काहींनी अटापिटा केला तर काहींचे डॉ. साळवे यांना या पदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु होते. डॉ. साळवे यांनी हे पद मिळण्यासाठी काहींशी आर्थिक व्यवहारही केल्याचे बोलले जात होते. अखेर डॉ. साळवे यांना वायसीएमएचचे विभागप्रमुखपद आयुक्तांनी बहाल केले आहे.

विविध विषयांमुळे डॉ. रॉय वादात
मागील स्थायी समितीमध्ये डॉ. रॉय यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी सदस्यांनी केली होती. मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी प्रशासनाकडून करण्यात आली नाही. कॅथलॅब प्रकरणामध्ये 54 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार डॉ. रॉय यांनी केला. बेकायदेशीर करारनामा असताना प्रशासनाकडून त्यांना पाठीशी घातले जातेय. मात्र डॉ. रॉय यांनी महापालिका, आयुक्त, नगरसेवक या सर्वांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सूचना स्थायी सदस्यांनी दिल्या होत्या. त्यावर प्रशासनाने या ठरावाकडे दुर्लक्षच केले होते. डॉ. रॉय यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांंतर्गत गुन्हा दाखल झाला. डॉ. रॉय यांना आयुक्त हर्डीकर यांच्या निर्णयामुळे धक्का बसला आहे.

कामाकाजावर परिणाम
डॉ. रॉय आणि डॉ. साळवे या दोघांच्या वादामुळे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला होता. मात्र डॉ. रॉय सातत्याने वादाच्या भोवर्‍यात असल्याने त्यांचे पद काढून डॉ. साळवे यांच्याकडे कामकाज सोपवले असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.