भारतीय आयुर्विज्ञान परिषदेकडून अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी मंजुरी
विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्माकर पंडीत यांनी दिली माहिती
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला शुक्रवारी मान्यता मिळाली आहे. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली. त्यामुळे वायसीएममध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी 24 जागा भरण्यात येणार आहेत. पदव्युत्तर वैद्यकीय संस्था करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका भारतातील पहिली महापालिका असल्याचे, ‘वायसीएम’चे विशेष कार्य अधिकारी डॉ. पद्माकर पंडीत यांनी सांगितले. यामुळे वायसीएमवरील ताण होणार कमी होणार असल्याचा विश्वास देखील डॉ. पंडीत यांनी व्यक्त केला. महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेला सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे उपस्थित होते.
विविध 103 पदे मंजूर
डॉ. पंडित यांनी सांगितले की, संत तुकारामनगर येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 750 खाटांचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. या ठिकाणी औद्योगिक नगरीसह आजुबाजूच्या ग्रामीण भागातून तसेच राज्याच्या इतर भागातूनही हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. या रूग्णालयात आठ प्रकारच्या विशेष सेवा उपलब्ध आहेत. वायसीएम रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता असते. त्यामुळे रुग्णांची अचडण होते. या ठिकाणी पूर्णवेळ, नियमित आणि तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी उपलब्ध व्हावेत. यासाठी रुग्णालयामध्येच स्वतंत्र पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला होता. त्यानुसार वायसीएमएच रुग्णालयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही कार्यान्वित आहे. या महाविद्यालयासाठी विविध 103 पदे मंजूर झाली आहेत.
नियमानुसार जागा भरणार
नवीन अभ्यासक्रमासाठी नऊ प्राध्यापक, 15 सहयोगी प्राध्यापक तसेच 21 सहायक प्राध्यापक अशी 45 पदे भरण्यात आली आहेत.
या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या सात अभ्यासक्रमाला शुक्रवारी मान्यता दिली. यामध्ये कान, नाक, घसा-3, भूलशास्त्र-4, मानसोपचार-3, स्त्रीरोग व प्रसुती-3, बालरोग -4, विकृतीशास्त्र-3, अस्थिरोग-4 या सात अभ्यासक्रमांना आणि त्यासाठी 24 जागा भरण्यास मान्यता मिळाली आहे. एप्रिल महिन्यात या जागा भरल्या जाणार आहेत. त्यामध्ये 12 जागा भारतभरातून तर 12 जागा महाराष्ट्रातून भरल्या जाणार आहेत. गुणवत्ता, शासकीय नियमानुसार या जागा भरण्यात येणार आहेत.
वायसीएमवरील ताण कमी
सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय चालविणारी पिंपरी-चिंचवड देशातील एकमेव महापालिका आहे. महाविद्यालयासाठी गुणवत्तेवर विद्यार्थी मिळणार आहे. महाविद्यालयामुळे वायसीएमएचाला डॉक्टर उपलब्ध होणार आहेत. निवासी डॉक्टर असल्याने वायसीएमवरील ताण कमी होईल. त्यामुळे आगामी काळात वायसीएमएचमध्ये आमुलाग्र बदल होईल. ऑपरेशन थेटरच्या नुतणीकरणाचे देखील काम सुरु आहे. भविष्यात देशातील एक आदर्श रुग्णालय म्हणून वायसीएमएच रुग्णालय नावारुपाला येईल.