पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने ‘डेंग्यू रुग्णांचे व्यवस्थापन आणि जनजागृती’ या विषयावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) येथे कार्यशाळा संपन्न झाली. शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांकरिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे ब्रिगेडियर डॉ. चिटणीस आणि निरामय रुग्णालयाचे संचालक डॉ. दीपक साळुंखे यांनी डेंग्यू आजाराबाबत मार्गदर्शन केले. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळुंखे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, इंडियन मेडिकल असोसिएशन, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे सदस्य आणि महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व शहरातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
खासगी रुग्णालयांनी अहवाल द्यावे
डेंग्यूचा उद्रेक होऊ नये, यासाठी आवश्यक खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयातून डेंग्यू रोगाबाबत महापालिकेकडे दररोज अहवाल सादर करावे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. डेंग्यूची बाधा होण्यासाठी जबाबदार असलेले एडिस इजिप्ताय या डासांविषयी डॉ. चिटणीस यांनी माहिती दिली. रोग पसरू नये आणि पसरला तर काय काळजी घ्यावी? याबाबतही त्यांनी माहिती दिली.
तत्काळ सुविधेमुळे धोका नाही
डेंग्यूच्या रुग्णांना आयसीयूची सुविधा तसेच इतर महत्त्वाच्या सुविधा तत्काळ उपलब्ध झाल्यास मोठा धोका उद्भवत नाही. त्यामुळे रुग्णांच्या प्लेटलेट्सबाबत अधिक काळजी करण्याची आवश्यकता नाही, असे डॉ. दीपक साळुंखे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल रॉय यांनी केले. डॉ. मनोज देशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.