वायसीएममध्ये स्वाईन फ्लूने एकाचा बळी

0

पिंपरी-चिंचवड : स्वाईन फ्लूचा आजाराचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शनिवारी औंध येथील रहिवासी असलेल्या एका 45 वर्षीय व्यक्तीचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 24 वर गेला आहे. आरोग्य विभागाकडून स्वाईन फ्लूबाबत जनजागृती व उपाययोजना केली जात असताना साथ आटोक्यात येत नसल्याची स्थिती आहे.

सहा महिन्यात 193 जणांना लागण
औंध येथील एका रुग्णाला 10 जुलै रोजी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्याने पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती अतिशय गंभीर होऊन शनिवार (दि. 22) रात्री साडेबारा वाजता त्या रुग्णाचा मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही महिन्यांपासून ’स्वाईन फ्लू’ने ठाण मांडले असून, गेल्या सहा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयात 24 रुग्णांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला आहे. मागील सहा महिन्यात शहरातील 193 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सध्या 34 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत असून, 24 रुग्णांचा बळी गेला आहे.