‘वायसीएम’ रुग्णालयाच्या बेपर्वाईमुळे तरुणाचा मृत्यू?

0
राष्ट्रीय श्रमिक आघाडीची मागणी
पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या ‘वायसीएम’ रुग्णालयातील डॉक्टरांच्या अक्षम्य  बेपर्वाई आणि प्रशासनाच्या ढिसाळपणामुळे गरीब घरातील एका 19 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप करत या प्रकरणातील दोषी डॉक्टरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे.  याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
डॉक्टरांमुळे हकनाक बळी
याबाबत पत्रकार परिषदेत ते म्हणाले, घोडेगाव येथील गणेश गव्हाणे या तरुणाचा दुचाकीवरुन पडून रविवारी (दि.14) अपघात झाला. त्याला उपचारासाठी तातडीने वायसीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्या हनुवटीला मार लागला होता. रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगदाळे यांना रुग्णाचा रक्तस्त्राव जास्त होत असल्याचे सांगून स्वत: तपासणी करण्याची विनंती केली. परंतु, डॉक्टरांना बोलवित असल्याचे सांगत त्यांनी तपासणी केली नाही. कोणत्याही डॉक्टरांनी तप्तरता दाखविली नाही. गणेश याला वेळेत उपचार मिळाले नाहीत. डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळेच त्याचा बळी गेला आहे.
मृत तरुण कमावता
गणेश हा अतिशय अतिशय गरीब शेतकरी कुटुंबातील होता. तो एकटाच कमविता होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. त्याच्यावर उपचार करण्यास हलगर्जीपणा करणार्‍या डॉक्टरांवर कडक कारवाई करण्यात यावी. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत गणेश याच्या कुटुंबियांशी चर्चा करुन पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.