वायसीएम रुग्णालयाच्या टेंडरमध्ये रिंग; जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार 

0
आयुक्त, आरोग्य वैद्यकीय अधिकार्‍यांचा सहभाग असल्याचा मजीद शेख यांचा आरोप
पिंपरी चिंचवड : महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे हे कर्तव्यात कसूर करीत आहेत. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांना पाठीशी घालत आहेत. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर आणि डॉ. साळवे हे रिंग पद्धतीने संगनमताने रुग्णालयाचे अंतर्गत कामांचा ठेका आपल्या मर्जीतील ठेकेदारांना देतात. त्यामुळे प्रामाणिक ठेकेदारांना याचा त्रास होत आहे. रुग्णालयात औषधे उपलब्ध असतानाही बाहेरील केमिस्टकडून औषधे आणण्याची सक्ती केली जाते. यात बाहेरील केमिस्ट व ठेकेदार यांच्यात आर्थिक लागेबांध आहेत. रुग्णालयातील अतिदक्षता कक्ष सर्वसामान्य नागरिकांकरीता उपलब्धच नसतो, त्याकरीताही रुग्णालयात वशिला लावावा लागतो, असा आरोप जन अधिकार संघटनेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष मजीद शेख यांनी केला आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन त्यांना समस्यांचे निवेदन दिले आहे.
रुग्णालयात चौकशी समिती नेमावी…
या सर्वांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व वायसीएम रुग्णालयाचे अधिकारी डॉ. पवन साळवे हेच जबाबदार आहेत. याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित रुग्णालयात चौकशी समिती नेमून, कर्तव्यात कसूर करणार्‍या डॉक्टरांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. 15 दिवसात जर या प्रकरणाचा छडा लागला नाही, तर जन अधिकार संघटनेच्यावतीने संविधान व कायद्यास धरून, पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर पिंपरी चिंचवड सलमानी जमातीचे नसिम शेख, लोक जनशक्ती पक्षाचे प्रवीण कांबळे, स्वराज प्रतिष्ठानचे कांबळे, समाजवादी पक्षाचे रफिक कुरेशी आदींच्या सह्या आहेत.