पिंपरी-चिंचवड : सुरक्षेच्या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे. जोपर्यंत डॉक्टरांना सुरक्षा प्रदान केली जात नाही; तोपर्यंत रुग्णसेवेला प्रारंभ केला जाणार नाही, अशी भूमिका शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी घेतली आहे. धुळे येथील शासकीय रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची घटना ताजी असताना मुंबईतही डॉक्टर, वॉर्डबॉयला मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांना सुरक्षा प्रदान केलीच पाहिजे, अशी मागणी डॉक्टरांकडून केली जात आहे. पिंपरी येथील (वायसीएम) यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीदेखील सुरक्षेच्या मागणीसाठी गुरुवारपासून संप पुकारला आहे. सकाळपासूनच डॉक्टरांनी संप पुकारल्याने रुग्णसेवा कोलमडली होती. उपचाराअभावी रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली. डॉक्टरांनी एकत्र येत या संपाविषयी रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले.
राजकीय दबाव नको
रुग्णालयात उपचारासाठी येणार्या रुग्णांसोबत नातेवाईकांचा लोंढा असतो. त्यामुळे रुग्णावर उपचार करताना मर्यादा येतात. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक क्षुल्लक कारणांवरून डॉक्टरांना दमदाटी तसेच मारहाण करतात. काही रुग्णांचे नातेवाईक तर उपचारासाठी राजकीय लोकप्रतिनिधींचा दबाव आणतात. डॉक्टरमंडळी रुग्णांवर उपचार करत असताना सरळ डॉक्टरांच्या कानाला फोन लावतात. आधी आमच्या रुग्णाला तपासा, असे सांगून वाद घालत असतात. या बाबींना विरोध केला तर धमक्यादेखील दिल्या जातात. राजकीय दबावामुळे रुग्णालयात काम करण्याची इच्छा होत नसल्याची खंत डॉक्टरांनी व्यक्त केली.
40 डॉक्टर्सचा संपात सहभाग
वायसीएम रुग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग नाही, डॉक्टर व इतर बाबींच्या सुरक्षेसाठी पुरेसे सुरक्षारक्षक नाहीत, रुग्णालयात डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मागणी करुनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. त्याचप्रमाणे राज्यभरात डॉक्टरांवर होत असलेले हल्ले लक्षात घेता, वायसीएम रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी गुरुवारी सकाळी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत सुरक्षेच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, सकाळपासूनच संप पुकारण्यात आला. या संपाची कल्पना रुग्णालय प्रशासनाला देण्यात आली. या संपात रुग्णालयातील 38 निवासी डॉक्टर व रुबी अल केअरचे दोन असे 40 डॉक्टर सहभागी झाले आहेत.
मिळणारे मानधनही कमी
संपात सहभागी झालेले सर्व डॉक्टर्स रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एकत्र आले होते. यावेळी आपल्या मागण्या माडतांना उपस्थित डॉक्टरांनी सांगितले की, आम्हाला मानधनही कमी मिळते, रुग्णालयात स्टाफ कमी आहे तसेच रात्रीच्यावेळी किंवा एरवीही रुग्णाबरोबर 8 ते 10 नातेवाईक येतात. ते सुरक्षारक्षकांना जुमानत नाहीत. डॉक्टरांशी उद्धटपणे बोलणे, धक्काबुक्की करणे किंवा सरळ कानाला फोन लावून हातातले काम सोडून आधी रुग्णाला तपासा अशा धमक्या देणे, असे प्रकार सातत्याने घडत आहेत. राजकीय दबावाखाली आम्हाला काम करावे लागत आहे, अशी तक्रारही डॉक्टरांनी केली. डॉक्टरांना सुरक्षा व्यवस्था प्रदान करून मानधनातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी डॉक्टरांनी केली.
रुग्णालय प्रशासनाला निवेदन
संपावर गेलेल्या डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिले. त्यानंतर रुग्णालयातील काही डॉक्टरांनी महापालिका आयुक्तांची महापालिकेत जाऊन भेट घेत, या संपाविषयी कल्पना दिली. हा संप किती कालावधीसाठी असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या संपामुळे; आधीच कमी कर्मचारी व त्यात संप यामुळे रुग्णांचे हाल होताना दिसत आहेत.