पिंपरी-चिंचवड : विविध कारणांनी कायम चर्चेत राहणार्या वायसीएम रुग्णालयात शुक्रवारी कामावर असणार्या दोन डॉक्टरांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला आहे. हजेरी पुस्तकावर स्वाक्षरी करण्यासाठी गेलेल्या एका डॉक्टरला दुसर्या डॉक्टरने शिवीगाळ केली. त्यामुळे दोघांत वाद होऊन हाणामारी झाली. रुग्णांसमोरच शाब्दिक वाद होऊन त्याचे पर्यावसान ‘कपडेफाड’ हाणामारीत झाल्याने रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण झाली. हा प्रकार वैद्यकीय अधीक्षकांच्या कार्यालयासमोर घडला.
एकमेकांचे फाडले कपडे
सकाळी नऊ वाजता संबंधित डॉक्टर हजेरी पुस्तकावर सही करण्यासाठी आले होते. त्यावेळी दुसर्या डॉक्टरने त्यांना शिवीगाळ केली. यामुळे दोघांत शाब्दीक बाचाबाची झाली. याचे रुपांतर भांडणात झाले. यामध्ये दोन्ही डॉक्टरांनी एकमेकांचे कपडे फाडण्यापर्यंत प्रकरण वाढले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडे अथवा रुग्णालय प्रशासनाकडे कोणाचीही तक्रार आली नसल्याचे सांगण्यात येत आहे.