वाया जाणारे पाणी भागवणार 30 गावांची तहान!

0

मुंबई । अमळनेर मतदार संघातील तामसवाडी, ता. पारोळा या धरणातील वाया जाणारे पावसाचे पाणी इंदासी धरण पिंपळकोठा येथे साठवणुकीसाठी सोडण्याची मागणी आ. शिरीष चौधरी यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचेकडे केल्याने मंत्र्यांनी सकारात्मक शिफारस सचिवांकडे केली असून यामुळे लवकरच परिसरातील 25 ते 30 दुष्काळग्रस्त गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.

जलसंपदामंत्र्यांशी चर्चा
या संदर्भात आ. शिरीष चौधरी यांनी ना. महाजन यांची 10 जुलै रोजी प्रत्यक्ष भेट घेऊन मागणी संदर्भात लेखी पत्र दिले होते. यामध्ये अमळनेर मधील तामसवाडी धरणातून दरवर्षी पावसाचे पाणी मोठया प्रमाणात वाया जात असते. या धरणावरून वाया जाणारे पाणी इंदासी धरण पिंपळकोटा या धरणामध्ये साठवणुकीसाठी सोडण्याबाबत उपाय योजना झाल्यास तामसवाडी धरण व इंदासी धरणालगत असणार्‍या 25 ते 30 दुष्काळग्रस्त गावांना याचा फायदा होणार आहे. चर्चा करताना अधिक खरी परिस्थिती लक्षांत आणून दिली यामुळे मंत्र्यांनी क्षणाचा विलंब न करता दिलेल्या पत्रावर तात्काळ कार्यवाही करावी असे आदेश देऊन तशा प्रत्यक्ष सूचनाही सचिवांना दिल्या आहेत.

टंचाई दूर होणार
यामुळे आता तामसवाडीचे वाया जाणारे पाणी निश्चितपणे इंदासी धरणात जाईल व यामुळे परिसतील अनेक दुष्काळग्रस्त गावे जलयुक्त होतील अशी भावना आ. चौधरी यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान सतत अवर्षणप्रवण असलेल्या अमळनेर मतदार संघात यावर्षीही वरुण राजाची अवकृपा होत असल्याने शेतकरी राजासह जनता संकटात आहे. या निर्णयामुळे 30 गावांतील नागरिकांची तहान कायमस्वरूपी भागणार आहे.