वायुसेना भरतीसाठी विद्यार्थ्यांची गर्दी

0

जळगाव । राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या केसीई संस्थेच्या एकलव्य मैदानावर ऑटोमोबाईल टेक्निशियन, ग्राऊंड ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर, आयएएफ या पदासाठी दोन दिवसीय भरती प्रक्रियेला मंगळवार पासून प्रारंभ झाला आहे. राज्यातील 23 जिल्ह्यातून भरतीसाठी विद्यार्थी आले होते. भरतीसाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. पहिल्या दिवशी साडेचार हजार विद्यार्थ्यांनी भरती प्रक्रियेत सहभाग नोंदविला. सहभागी विद्यार्थ्यांची सुरुवातीला कागदपत्र पडताळणी करण्यात आली, त्यानंतर 360 विद्यार्थ्यांचे गट तयार करुन लेखी परिक्षा घेण्यात आली. रात्री उशीरापर्यत टप्पाटप्प्याने लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येते होते. सायंकाळी 7.30 वाजेपर्यत 180 विद्यार्थ्यांनी दिलेल्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आले होते. लेखी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांची आज बुधवारी पहाटेपासून छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकूलात शारिरीक क्षमता चाचणी घेण्यात येणार आहे.

दूसर्‍या दिवशीही जागरण
पहिल्या गटातील 360 विद्यार्थ्यांपैकी 22 तर दुसर्‍या गटातील 111 विद्यार्थी शारिरीक क्षमता चाचणीसाठी उत्तीर्ण झालेले होते. उर्वरीत तीन गटांचा निकाल रात्री उशीरापर्यत घोषीत करण्यात आले. वायुसेनेत भरती होण्याची इच्छा बाळगून असलेल्या भावी सैनिकांनी रात्र न झोपता काढली. सलग दुसर्‍या दिवशीही रात्री उशीरापर्यत लेखी परिक्षा प्रक्रिया सुरु होती. दुसर्‍या दिवशीही न झोपता विद्यार्थी शारिरीक क्षमता चाचणीसाठी उभे राहणार आहे.

‘कही खूशी, कही गम’
कागदपत्र पडताळणीनंतर घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा निकाल गटागटाने जाहीर करण्यात येत होते. लेखी परिक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी जल्लोष करीत होते तर लेखी परीक्षा उत्तीर्ण न झाल्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. भरतीसाठी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालकही आले होते, पाल्यांचे अश्रू बघून पालकांनाही रडू कोसळल्याची स्थिती मैदानावर दिसून येत होती. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना वायुसेनेतील अधिकारी समज व पुढील वर्षी चांगली तयारी करुन येण्याची सल्ला देत होते.

खासदारांनी मोजली उंची
भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार ए.टी.पाटील यांनी भरतीत सहभागी उमेदवाराप्रमाणे स्वत:चीही उंची मोजून घेतली. यावेळी त्यांच्या सोबत आमदार सुरेश भोळे, मनपाचे सुनील माळी,नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे सोबत होते. यानंतर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व्ही.व्ही.रत्नपारखी, वायुसेनेचे अधिकारी यांकडून त्यांनी भरतीच्या विविध टप्प्यांबाबत माहिती जाणून घेतली. भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी 12 वी इंग्रजी विषयात 50 टक्के गुणासह उत्तीर्ण असण्याची अट होती. मात्र अनेक विद्यार्थी हे 12 वी उत्तीर्ण नसतांनाही भरतीसाठी आले होते, अशा विद्यार्थ्यांना अगोदरच सुचना देवून माघारी पाठविण्यात आले.