राज्याच्या महसूल आणि वन विभागाचे प्रधान सचिव, तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या चार जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुक्रमे अदिती तटकरे, अनिल परब, डॉ. उदय सामंत, आणि दादा भुसे यांनाही या विषयीचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे की, वैश्विक हवामान बदलामुळे आणि वारंवार कमी दाबाचे पट्टे निर्माण झाल्यामुळे अरबी समुद्रात चक्रीवादळे निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच आगामी काळात अशी चक्रीवादळे येणार असल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे.
वर्ष 2019-20 मध्ये चार जिल्ह्यांतील काळेथर, आचरा, जामसंडे, विजयदुर्ग, सैतवडे, हर्णे, एडवण, दिघी, दाभोळ, बोर्ली आणि उसरणी येथे बहुउद्देशीय चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्या ठिकाणी ही निवाराकेंद्र समयमर्यादा ठेवून तात्काळ उभी करावी. ज्याप्रमाणे चक्रीवादळाच्या पूर्वी मच्छीमारांना पूर्वकल्पना दिली जाते. त्याचप्रमाणे वादळी क्षेत्रातील फळबागायतदार, शेतकरी, व्यावसायिक यांनाही सतर्क करण्यासाठी यंत्रणा उभी करावी. जेणेकरून या वादळापूर्वी पिकांचा उतारा घेऊन या सर्वांची हानीही टाळता येईल. त्यासह चक्रीवादळांच्या क्षेत्रांत पीकांची, फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने तेथे कोणती पिके घ्यावीत, वादळामुळे होणारी हानी टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यावी, तेथील बांधकामे कशा प्रकारची असावी याविषयीही तेथील नागरिकांना मार्गदर्शन करावेे, तसेच पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांत आलेल्या चक्रीवादळांची पूर्वतयारी म्हणून लक्षावधी नागरिकांचे प्राधान्याने स्थलांतर केल्याने तेथील संभाव्य जिवीतहानी टळली. त्याच धर्तीवर राज्य शासनाने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्याही शासनाकडे करण्यात आल्या आहेत.