पावसाळा सुरू झाला की वारीचा गजर अवघ्या महाराष्ट्राला दुमदुमून टाकतो. महाराष्ट्र आणि शेजारील अनेक राज्यातून वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक प्रकारची संकटे पेलून पंढरीकडे आगेकूच करत असतो. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकर्यांना कुठलेही संकट हे संकट कधीच वाटत नाही. नि:स्वार्थ भावनेने आणि उदात्त हेतूने वारकरी आपले मार्गक्रमण करत असतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशात अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या वारीमध्ये काळानुरूप अनेक प्रकारचे बदल घडत आले असले तरी अनेक परंपरा आजही कायम आहेत आणि भविष्यातही त्या जपल्या जातील. मात्र या वारीच्या परंपरेला कुठंतरी गालबोट लावत अडथळे आणण्याचा प्रकार झाल्याने वारकर्यांचा संताप उफाळून आला. शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांच्या एक हजार कार्यकर्त्यांवर गुन्हाही दाखल झाला आहे. भिडे गुरुजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणार्या एका विशिष्ट वर्गाचे देखील आदर्श आहेत, ही गोष्ट विशेष नवलाची आहे. शिवजयंती उत्सव सुरू करणार्या आणि शिक्षणाची आणि समतेची ज्योत अवघ्या राष्ट्रात जागवणार्या महात्मा फुलेंवर भिडेंनी गरळ ओकलेली आहे. संत तुकाराम महाराज यांना गुरू मानणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाला वेगळ्याच पद्धतीने समोर ठेवून आपला एक विशिष्ट चाहतावर्ग निर्माण करण्यात भिडे गुरुजींना यश आलेय हे मात्र नक्की.
वारीच्या संस्कृतीमध्ये विनाकारण दखलंदाजी करण्याचा प्रयत्न भिडे यांच्या धारकर्यांकडून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः असते तर त्यांनी काय केले असते? असा नेहमीचा प्रश्न विचारून आणि त्या प्रश्नाचे उत्तर समजून घेऊन हा विषय चांगल्या पद्धतीने समजून घेतला जाऊ शकतो. पत्रकार मोहन जाधव यांनी भिडे गुरुजींना ’गुरुजी, जगण्याची लढाई शिकवा’ या लेखात योग्यच प्रश्न विचारले आहेत. त्यांनी त्यात सांगितलेय की, शिवप्रतिष्ठानच्या आंदोलनाचा खरा फटका बहुजन समाजातील पोरांना बसत आहे. अनेक वेळा त्यांच्या आंदोलनाला रक्तरंजित संघर्षाचे स्वरूप आलेले आहे. अनेकदा धारकार्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे देखील जावे लागलेय. पोलीस केसेस अंगावर घेऊन अनेक तरुणांचे आयुष्य बरबाद झाले आहे, अजूनही कायद्याच्या लढाया युवक लढताहेत. तिथं वाचवायला भिडे गुरुजी अर्थातच येत नाहीत. गुरुजींची अशी अजून माहिती अर्थातच गुगल केल्यावर आपल्याला मिळूनच जाते. पानसरे अण्णांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या नावातील ’शिवाजी’ या एकेरी नावावर नाहक रान उठवणारी आणि शिवाजी महाराजांना केवळ डोक्यावर मिरवणार्या लोकांना कितपत गांभीर्याने घ्यायचं यावर सुज्ञ लोकांनी विचार करायला हवा. खरंतरं छत्रपती शिवाजी महाराज यांना डोक्यावर न घेता डोक्यात घेणेच आवश्यक असताना देखील संस्कृतीच्या नावाखाली काही लोकं नाहक घोळ घालताना दिसत आहेत.
असो, राज्यभरातल्या वार्या आता पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. प्रचंड उत्साहात उन्हा-पावसाची पर्वा न करता वारकरी भक्तीने तल्लीन होऊन पांडुरंगाच्या भेटीला निघालाय. मागील एक दोन वर्षात पांडुरंगाच्या मंदिरात अनेक नियम बनले आहेत. खरंतर व्यवस्थेचे नियोजन नसल्यामुळे असे नियम बनवावे लागतात हे दुर्दैवीच. मागील महिन्यात एका पुजार्याने एका भक्ताला मंदिरात मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या घटनेनंतर समाजमनातून संताप व्यक्त केला गेला होता. धार्मिक स्थळावर देवाकडे धावा करत आलेल्या भाविकांच्या भावनेला अशा घटनांनी ठेस पोहोचते.
मागील काळात काही चांगल्या प्रशासकीय अधिकार्यांमुळे इथले कामकाज सुधारले गेलेय. इथल्या भ्रष्टाचारी व्यवस्थेला वठणीवर आणण्याच्या दृष्टीने काही चांगले बदल देखील केले गेले आहेत. व्हीआयपी संस्कृती मोडीत काढत व्हीआयपी दर्शन बंद केल्याचे देखील नुकतेच कळले. हे निर्णय दोन दोन दिवस दर्शन रांगेत उभा राहून 2 सेकंदही विठुरायाचे दर्शन न मिळालेल्या भाविकांसाठी अतिशय चांगले आहेत. मात्र पुढार्यांची पत्रे अथवा वशिले घेऊन येणार्या व्हीआयपी भक्तांवर आळा घालण्यास प्रशासन कितपत यशस्वी होतेय हे बघण्याजोगे आहे. वारीच्या काळात पंढरीत घाणीचे प्रचंड साम्राज्य असते. यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाला अजून यश मिळालेले नाही. शेगावच्या धर्तीवर इथे काही केले जाऊ शकते का ? यावर देखील विचार होणे आवश्यक आहे. बाकी कितीही समस्या आणि अडथळे आले तरी वर्षानुवर्षे वारी करणारे सच्चे वारकरी आणि भक्तांना सलाम करावा तेवढा कमीच आहे.
– निलेश झालटे