वारकरी म्हणून काम केल्याची मिळाली पावती -माजी मंत्री एकनाथराव खडसे

0

भुसावळात आपले परीवार सार्वजनिक वाचनालय व सदगुरू धनाजी महाराज प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञता ऋणानुबंध व सन्मान सोहळा

भुसावळ- आदिशक्ती मुक्ताईच्या परीसरात जन्म झाल्यानंतर वारकरी म्हणून जीवन जगत असताना वारकर्‍यांसाठी आयुष्यभर काम केले, पंढरपूरचा मठ मिळवून घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांकडे पाठपुरावा केला हे सर्व कार्य करत असताना कोणताही स्वार्थ नव्हता व वारकरी म्हणून काम केल्याने आज या कामाची पावती म्हणून कृतज्ञता ऋणानुबंध व सन्मान सोहळा झाला असल्याचे मत माजी महसूलमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. आपले परीवार सार्वजनिक वाचनालय व सदगुरू धनाजी महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

यांची होती व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र कुंडलेश्वर येथील भरत महाराज बेळीकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगरसेवक पिंटू ठाकूर, सभापती प्रीती पाटील, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, मसाका चेअरमन शरद महाजन, नरेंद्र नारखेडे, नगराध्यक्ष रमण भोळे, सुधीर पाटील, रजनी संजय सावकारे, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, अरविंद वारके, दिनेश नेमाडे, प्रभा पाटील, शैलजा पाटील, सुशीला सावकारे, पी.व्ही.पाटील, रघुनाथ अप्पा सोनवणे, लक्ष्मण महाराज, किशोर महाराज, रमाकांत महाराज, सुधाकर महाराज, शरद महाराज, सुरेश महाराज, दत्तात्रय महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक माजी मुख्याध्यापक शांताराम पाटील यांनी केले. माजी मंत्री एकनाथराव खडसे व भरत महाराज यांना सन्मानपत्र मानपत्र स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन महाविद्यालयातील माजी प्रा.कमल पाटील यांनी केले. त्यानंतर शरद महाराज किशोर महाराज यांनी मनोगत व्यक्त केले. खासदार रक्षा खडसे यांनी आगळ्यावेगळ्या कृतज्ञता सोहळ्याचे कौतुक करून खडसे परीवारावर जनतेने दाखवलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन दीपक महाराज यांनी तर आभार शांताराम पाटील यांनी मानले.