गावठी कट्ट्यातून झाडली गोळी ; तीन अटकेत, पाच जणांविरुद्ध गुन्हा
धुळे : तालुक्यातील वार कुंडाणे येथे गावठी कट्ट्यातून गोळी झाडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता धुळे तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तीन जणांना ताब्यात घेण्यात आले असून दोन जण पसार झाले आहेत.
वार कुंडाणे गावाजवळील थरार
धुळे तालुक्यातील कुंडाणे (वार) शिवारातील कुंडाणे फाट्याच्या पुढे असलेल्या एका पडीत घराजवळ हा थरार घडला़ सोमवारी रात्री यऊ वाजेच्या सुमारास दीपक दगडू वाघ (28) रा.कुंडाणे (वार) याच्यावर गावठी कट्यातून गोळी झाडण्यात आली. ही गोळी त्याच्या खांद्याला लागल्यानंतर मारेकरी घटनास्थळावरुन पसार झाले तर जखमी अवस्थेत दीपकला हिरे वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय उपचारासाठी आणण्यात आले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच धुळे विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी हिंमत जाधव, साक्रीचे निलेश सोनवणे, धुळे तालुका पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे, पोलीस उपनिरीक्षक आर. एस. माळी यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला़
पाच जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक
या प्रकरणी साहेबराव विठ्ठल वाघ रा. कुंडाणे (वार) यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी अभय दिलीप अमृतसागर (रा. कुंडाणे), पंकज परशराम जिसेजा (रा. मोगलाई), भांग्या उर्फ मुकेशनाना उर्फ मुरलीधर अमृतसागर (रा.रेल्वेस्टेशन रोड), पंकज उर्फ भुरेय जीवन बागले (रा. रमाईनगर, धुळे), गोटू दगडसिंग पावरा (रा. कुंडाणे ता. धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अभय अमृतसागर, पंकज जिसेजा आणि गोटू पावरा यांना अटक करण्यात आली तर भांग्या उर्फ मुकेशनाना उर्फ मुरलीधर अमृतसागर आणि पंकज उर्फ भुरे जीवन बागले हे दोघे पसार आहेत.