वारजे । वारजे जकातनाका परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या दारूधंद्यावर वारजे पोलिसाच्या पथकाने अचानक धाड टाकून 25 लिटर हातभट्टी जप्त केली असून ती विक्री करणार्या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दारूविक्री करणारी महिला फरार झाली आहे. अवैध दारूधंद्याबाबतचे वृत्त जनशक्तिमध्ये (दि.16 सप्टेंबर, पान : 2, ‘वारजेत हातभट्टीचा सुळसुळाट’) प्रसिद्ध झाले होते.
याबाबत लखन मुन्ना बिरे, (25, रा. वारजे जकातनाका) मारुती चंदर जाधव (30, रा. गोसावी वस्ती, कर्वेनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांना दारूविक्री करण्यास भाग पाडणारी नंदा परदेशी ही महिला फरार झाली असून वारजे पोलिस तिचा शोध घेत आहेत. वारजे जकातनाका येथील तिरुपतीनगर भागाकडे जाणार्या रस्त्यावर छुप्या पद्धतीने अवैधरित्या दारूविक्री सुरू असल्याबाबत वारजे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सलील नदाफ यांना माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने वारजे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक एस.बी. ताथवडे यांच्या मदतीने श्वेता हाईट्स येथे छापा टाकण्यात आला होता. तेथील हातभट्टी व दारूविक्री चालू सर्रास असल्याचे आढळून आले.