वारजेत वीजबिलांची अंदाजे आकारणी

0

छावा संघटनेचा आंदोलनाचा इशारा; सर्वसामान्यांना भुर्दंड

वारजे । महावितरण कंपनीने ग्राहकांच्या वीज बिलामधील गोंधळ कमी होण्यासाठी मीटरचे छायाचित्र प्रत्येक बिलावर छापण्यास सुरुवात केली. परंतु रिडिंग घेताना वेगळे व छायाचित्रात वेगळे बील दिसते. त्यात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. वीजबिलामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मीटर छायाचित्राचा वापर केला असला तरी बील वेळेवर मिळत नाही. मीटरवरील रिडिंग वेळोवेळी घेतले जात नाही. अंदाजे बिलाची आकारणी सर्रासपणे केली जाते. रिडिंगचा घोळ अद्यापही सुधारलेला नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक जादा रक्कमेचा भरणा महावितरणकडे करावा लागत आहे.

कोथरूड, वारजे, कर्वेनगर, शिवणे, उत्तमनगर या परिसरात अशा प्रकारच्या तक्रारीचे प्रमाण वाढलेला आहे. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना मोठया प्रमाणात होत असून ही चूक महामंडळाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर वीज बिलात दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना १५ दिवसांनी येण्यास सांगितले जाते. आधी बील भरा नंतर तक्रार करा. असे उत्तर महावितरण कंपनीकडून देण्यात येत आहे.

वीज कनेक्शन तोडण्याचे संकट
वीज बील भरले नाही तर वीज कनेक्शन तोडण्याची भीती ग्राहकांना असते. म्हणून आहे ते बील ग्राहकांना भरावे लागते. महामंडळाच्या अधिकार्‍यांच्या वागण्यात काहीही बदल झालेला दिसून येत नाही.
येत्या काही दिवसांत जर मीटर रिडिंगबद्दलची तक्रार लक्षात घेतली नाही तर छावा संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आशिष खंडेलवाल, पश्‍चिम महाराष्ट्र ग्राहक आघाडी अध्यक्ष राजाभाऊ पवार, गणेशभाऊ पवार, शरद कुंभार, शैलेंद्र गायकवाड, वारजे-कर्वेनगर भागातील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे पवार यांनी नमूद केले आहे.