माळवाडी चौकी शेजारीच बेकायदा दारूचे अड्डे
गणपती माथा, रामनगर,उत्तमनगर, शिवणे या परिसरात उघड्यावर दारूधंदे
दररोज लाखो रुपयांच्या दारूची सर्रास होते आहे विक्री
वारजे । एनडीए रस्त्यावरील वारजे येथील गणपती माथा, पॉप्युलरनगरच्या मागील टेकडीवर अक्षरश: रस्त्यावरच राजरोशपणे हातभट्टीच्या दारूची विक्री चालू आहे. रस्त्यावरच दारू पिऊन धिंगाणा घालणारे दारूडे, दारू अड्ड्यांमुळे व विक्रेत्यांमुळे परिसरातील नागरिकही त्रस्त झाले आहेत.
दारू पिणार्यांमध्ये मजुरांची संख्या अधिक
या परिसरात एक लाखांच्यावर रहिवासी आहेत. त्यांपैकी ५० ते ६० टक्के रहिवासी नोकरदार आहेत. दारू पिणार्यांमध्ये मजुरांची संख्या लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. दररोज लाखो रुपयांच्या दारूची सर्रास विक्री होत आहे. पाणी व रस्त्यासाठी आंदोलने व मोर्चे करणार्या संस्था, संघटना, राजकीय पक्ष या बेकायदा दारूधंद्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
पोलिसांच्या आर्थिक संबंधांचे बळ
पुणे शहर पोलिसदलाच्या हद्दीतील वारजे-माळवाडी, गणपती माथा, रामनगर, उत्तमनगर, शिवणे या परिसरात उघड्यावर दारूधंदे सुरू आहेत. माळवाडी चौकी शेजारीच बेकायदा दारूचे अड्डे आहेत. अनेक धंदे काही वर्षांपासून अव्यहातपणे सुरू आहेत.
श्रमजीवी, कष्टकर्यांची तरुण पिढी आता या बेकायदा दारूधंद्यात तरबेज झाली आहे. मोबाईल आणि अलिशान गाड्यांचा वापर दारूधंदे करणारे करत आहेत. पोलिस कारवाई होण्यापूर्वीच सर्वजण गायब होतात. नंतर पुन्हा दारूधंदा आहे त्याठिकाणी सुरू होतो. हे सर्व धंदे पोलिसांच्या आर्थिक संबंधांमुळे वाढले असल्याचे दिसून येत आहे.