वारजे पुलाचे काम संपणार कधी?

0

वारजे । वाहतूककोंडीची समस्या वारजेकरांसाठी काही नवीन राहिलेली नाही. अरुंद रस्ते, अस्ताव्यत पार्किंग व बेशिस्त वाहनचालकांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे. वारजे भागात पार्किंग झोन नसल्याने रस्त्यावरील गर्दीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यात वाहतूककोंडीची समस्या नागरिकांना भेडसावत आहे. यावर मात करण्यासाठी पालिकेच्यावतीने कर्वेनगर येथे उड्डाणपुलाचे काम सुरू केले आहे. परंतु संथ गतीने होत असलेल्या या पुलाच्या कामामुळे नागरिकांना अजून किती दिवस वाहतूककोडींचा सामना करावा लागणार आहे? असा प्रश्‍न नागरिकांनी पडला आहे. या रेंगळणार्‍या कामाला तीन महिन्यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल पाच वर्षे पूर्ण होतील.

वारजे-कर्वेनगर पुलाचे भूमीपूजन 10 फेब्रुवारी, 2013मध्ये मोठ्या दिमाखात झाले होते. मात्र, या पुलाच्या कामाला चार वर्षे पूर्ण होऊन हे काम अद्याप अपूर्णावस्थेत राहिलेले आहे. या संंथ गतीने चाललेल्या कामामुळे आणि रोजच्या वाहतूककोंडीने वारजेतील नागरिक हैराण झाले आहेत. वारजे-कर्वेनगर परिसरात विस्ताराच्या दृष्टीने व सभोवतालच्या भागातील वारजे एनडीए रस्त्यावर दुचाकींच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले यांना मात्र या जीवघेण्या वाहतूककोंडीला दररोज सामोरे जावे लागत आहे.

पुलासाठी 30 महिन्यांचा कालावधी
वारजेतील अत्यंत वर्दळीचा सर्वांत मोठा भाग म्हणून आंबेडकर चौक, रमेश वांजळे चौक, माळवाडी बसस्टॉप परिसर, गणपती माता परिसर या प्रमुख ठिकाणाकडे पाहिले जाते. या ठिकाणी चारही बाजूंनी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. या उड्डाण पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन या भागातील वाहतुकीची समस्या सुटावी यासाठी विविध पक्ष, संघटनांच्या वतीने आंदोलने, र्मोचे काढण्यात आले होते. परंतु परिस्थितीत काहीच सुधारणा दिसून येत नाही. वेळोवेळी मुदत वाढवूनही या पुलाचे काम अद्यापपर्यंत पूर्ण होऊ शकले नाही. महापालिकेने सुरुवातीला या पुलासाठी 30 महिन्यांचा कालावधी दिला होता. परंतु दिलेल्या कालावधीची मुदत संपून गेली.