वारसाची नोंद न झाल्याने संतप्त महिलेने बोदवड नगरपंचायत कार्यालय अधीक्षकांना लाथाबुक्यांनी बदडले

The woman slapped the office superintendent of Bodwad Nagar Panchayat
बोदवड :
मालमत्ता उतार्‍यावर वारस म्हणून नोंद करून घेण्यासाठी दोन वर्षांपासून नगरपंचायतीचे उंबरठे झिजवणार्‍या महिलेच्या संतापाचा बांध सुटल्याने संतप्त महिलेने नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यांना मंगळवारी दुपारी नगरपंचायतीच्या प्रवेशद्वाराबाहेरच चोपल्याने नगरपंचायतीच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा वाद पोलिस ठाण्यात पोहोचला व दोघांनी गुन्हा दाखल करण्याची भूमिका घेतली मात्र महिलेने माफीमागितल्याने वादावद पडदा पडला.

संतप्त महिलेने अधिकार्‍यास चोपले
सूत्रांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या पतीचे सुमारे अडीच वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांच्या घरासह मार्केटमधील दोन दुकानांची बनावट नोटरी मयताच्या भाच्याने करीत ती कागदपत्रे कार्यालयीन अधीक्षक चव्हाण यांना दिल्याचा आरोप आहे शिवाय गत काळात मालमत्ता कर आकारणीसाठी मोजणीचा कार्यक्रम राबवण्यात आल्यानंतर मालमत्ता धारकांना नगरपंचायतीने नोटीस दिली होती तर तक्रारदार महिलेच्या पतीच्या भाच्याच्या नावावर ही नोटीस देण्यात आल्यानंतर महिलेला ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी कागदपत्रांसह नगरपंचायतीत धाव घेत प्रॉपर्टी आपल्यासह मुलाच्या नावावर लावण्यासाठी उंबरठे झिजवले होते मात्र दाद मिळत नव्हती. दोन वर्षानंतरही न्याय न मिळाल्याने मंगळवारी महिलेच्या संतापाचा बांध सुटला व तिने कार्यालय अधीक्षक राजूसिंग चव्हाण यास लाथा-बुक्क्यांनी चोपून काढले.

झालेला प्रकार निंदणीय : मुख्याधिकारी
नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आकाश डोईफोडे याच्याशी संपर्क केला असता त्यांनी झालेला प्रकार हा कार्यालया बाहेर झाला असून तो त्यांचा वैयक्तिक वाद असू शकतो, असे सांगत मारहाणीचा प्रकार निंदणीय असल्याचे सांगितले. दरम्यान, नगरपंचायत कार्यालयात बांधकाम, पाणीपुरवठा विभाग अभियंता व आरोग्य अधिकारी ही पदे आजही अतिरीक्त असल्याने त्यामुळे नागरीकांचे कामे करताना अनेक अडचणी येत आहेत.